हुकूमशाहीच्या विरुद्ध संपूर्ण हिंदुस्थान उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरे यांचे फटकारे
संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचार पे चर्चा करा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच हुकूमशाहीच्या विरुद्ध संपूर्ण हिंदुस्थान उभा राहिल्याशिवाय राहणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आज दादरच्या शिवतीर्थावर महायुतीच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांविरोधात शिवसेनेने आंदोलन केले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आज संपूर्ण महाराष्ट्र जागा झालेला आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात, प्रत्येक जिल्ह्यात या भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे. सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला मर्द लागतो आणि तो मर्द आपल्या शिवसेनेत आहे. आता तुम्ही ज्या घोषणा दिल्या की या भ्रष्टाचाऱ्यांचे करायचे काय खाली डोकं वर पाय. पण यांना डोकं असेल तर ना. कारण हे बिनडोक्याचे आहेत आणि त्यांना सूरत आणि गुवाहाटीला पळून जाण्यासाठी फक्त पाय आहेत. त्यांना डोक्याच्या ऐवजी फक्त खोके आहेत. म्हणून ते खोके घेऊन बसले आहेत. एकूण जर विचार केला तर दिल्लीमध्ये महाविकास आघाडी, इंडिया आघाडीतर्फे निवडणूक आयोगावर मोर्चा काढला आहे. पण पोलिसांनी त्यांना अडवलंय. आपणही भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरलेलो आहोत. ही जुलूमशाही सुरू आहे, त्याविरोधात जनता रस्त्यावर उतरलेली आहे. आपण दरवेळी सांगतो की हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, शाहु, फुले आणि आंबेडकरांचा आहे. देशाला दिशा दाखवणारा आपला महाराष्ट्र, अभिमान आणि गौरवपर वाटणारा महाराष्ट्र या भ्रष्ट युतीने महाराष्ट्राला कुठे नेऊन बसवलं आहे. भ्रष्टाचारात पहिला क्रमांक पण विकास आणि नितीमत्ता पाहिली की महाराष्ट्र शेवटच्या रांगेत. ज्या वेळी आपलं सरकार होतं आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आजपर्यंत अशी परंपरा होती की कुठल्याही मंत्र्यावर आरोप झाले की त्याची जबाबदारी घेऊन त्या मंत्र्य़ांचा राजीनामा घेऊन त्यांना चौकशीला सामोरं जावं लागतं. मीसुद्धा मुख्यमंत्री असताना राजीनामे घेतले होते. एका मंत्र्यावर महिलेचे आरोप होते, तो वनमंत्री असताना त्याला वनवासात पाठवलं होतं. अगदी केंद्रातही अशा घटना होत्या. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना पाच मंत्री शोभाताई फडणवीस, घोलप, सुतार आणि रवींद्र माने यांच्यावर आरोप झाले आणि त्यांचे राजीनामे घेतले. शिवसेनाप्रमुख म्हणाले की जनतेचा रोष आहे, राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरं जा, जर चौकशीतून निर्दोष सुटलात तर मंत्रिमंडळात घेईन. हा होता कारभार. ते जनताभिमुख सरकार होतं. आता जनताभिमुख सरकार नाही तर पैसे गिळणारे मुख आहे. आपण फक्त आरोप नाही केले, अंबादास दानवे, अनिल परब यांनी पुराव्यानिशी त्यांची लक्तरं वेशीवर टांगली होती. कोणी डान्सबार चालवतंय, कोणी बॅगा घेऊन बसलंय. एक गोष्ट विचित्र पण चांगली पहायला मिळाली की, जसे अभ्यास कोणताही असो, आवड कोणतीही असो पण सत्ता टिकवायला कोणते तरी मंत्रिपद आपल्याला द्यावं लागतं. पण पहिल्यांदाच असं झालं की एका व्यक्तीला आवडीचं खातं मिळालं. रमी मंत्री. हे रमी मंत्री आहेत क्रीडा मंत्री नाहीत. शेतकऱ्यांची थट्टा करतात. आणि भर सभागृहात रमी खेळतात. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत, तुमच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला तुमच्याकडे वेळ नाहिये. पुरावे देऊनही मंत्र्यांची हकालपट्टी केली जाईल अशी आमची अपेक्षा होती. पण मुख्यमंत्री समज देतात की रमी नका खेळू तीन पत्ती खेळा म्हणून. समज देऊन सोडलं की पुढच्यावेळी बॅग बंद करून ठेव म्हणून. पुढच्यावेळी सावली बार नव्हे भर उन्हाचा बार काढ. पुरावे देऊनसुद्धा या भ्रष्टाचाऱ्यांना केवळ समज देऊन सोडून देणार असाल तर मग आमच्या उपराष्ट्रीपतींना तत्काळ राजीनामा घेऊन वनवासात का पाठवलं? जगदीप धनखड कुठे आहेत? दिल्लीत गेल्यावर मला कळाले की धनखड हे सरकारविरोधात काही तरी कारस्थान करतील असा संशय आला म्हणून त्यांना तडकाफडकी काढलं आणि गायब केलं. ही समज धनखड यांना का नाही दिली? चीनमध्ये तुम्ही कळत किंवा नकळत तिथल्या सरकारविरोधात कुणी बोललं की दोन ते तीन दिवसांत तो मनुष्य अदृश्य होतो कुठे जातो कळतच नाही. नवीन उपराष्ट्रपती झालेले नाहीत. धनखड यांनी जरी राजीनामा दिला असला तरी ते आहेत कुठे? कारण त्यांनी प्रकृतीकारणास्तव राजीनामा दिला होता. मग ते सध्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेत? कोणता डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहे, की तुम्ही त्यांचे डायरेक्ट ऑपरेशन केले आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
तसेच ज्या दिशेने हा राज्यकारभार चालला आहे, ज्या दिशेने आपला देश आणि महाराष्ट्र चालला आहे. आज परत एकदा आपल्या खांद्यावर ही जबाबदारी आलेली आहे. हे जरा वेगळे आंदोलन आहे, हे शिवसेना स्टाईलचे आंदोलन नाहिये. शिवसेना म्हटल्यावर कसे आंदोलन होतं हे आपल्या माहित आहे. मी आज महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना सांगतो की, 2014 ला चाय पे चर्चा केली होती तशी ती तुम्ही जिथे जाल तिथे चहाच्या टपरीवर बसा, केस कापायला सलूनमध्ये बसा, रेस्टॉरेंटमध्ये बसा सावली बार सोडून कुठेही बसा आणि भ्रष्टाचारपे चर्चा होऊ द्या. भ्रष्टाचारपे चर्चा. जोपर्यंत हे भ्रष्टाचारी मंत्री काढून टाकले जात नाही तोपर्यंत आपले आंदोलन थांबणार नाही. मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते, पाशवी बहुमत आहे, वरती दिल्लीमध्ये तुमचे बापजादे बसले आहेत तरी तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचाऱ्यांना काढून टाकायची. फडणवीसांची अवस्था पहा. आपण असे समजू की त्यांनी कुठलाही भ्रष्टाचार केलेला नाही, मग का त्यांच्यासाठी तुम्ही बदनामी ओढवून घेत आहात. का तुम्ही त्यांच्यावर पांघरूण घेत आहात. जगातला सर्वात मोठा पक्ष भाजप त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणसं नाहियेत. तसंच तुम्हाला भ्रष्ट मंत्री काढून त्यांच्याऐवजी दुसऱ्याला संधी द्यायला दुसरा माणूस नाहिये? कुणाचा दबाव आहे तुमच्यावरती? हा भ्रष्टाचार तुम्हाला पटतो का हे फडणवीसांनी जाहीर करावे. अन्यथा फडणवीसांनी सांगावं की हे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, दबाव आहे माझ्यावर. अरे मग दबाव झुगारून द्या. नाहीतरी तुम्ही मतांची चोरी केलेली होती, त्याविरोधात दिल्ली आंदोलन सुरू आहे. आणि काँग्रेसने त्यांना चांगला शब्द दिला आहे थीफ मिनिस्टर हे चोरांचे सरदार आहेत. सत्ता येते आणि सत्ता जाते पण इतिहासात तुमची नोंद काय होते हे महत्त्वाचं आहे. म्हणून फडणवीसांना सांगतोय की तुमच्यात जरा जरी स्वाभिमान, अभिमान आणि धैर्य असेल तर वरचा दबाव पाहू नका. तुमचा जर खालचा दबाव वाढला तर महाराष्ट्रात तुम्हाला पळता भुई थोडी होईल. ज्या ज्या पद्धतीने महाराष्ट्रात हा भ्रष्टाचाराची माहिती पोहोचवता येईल त्या त्या पद्धतीने पोहोचवा. गणेशोत्सवातही ही माहिती पोहोचवा. त्यांना कळूदे की आम्ही गणपती भक्त आहोत, या भ्रष्टाचाऱ्यांचे अंधभक्त नाही आहोत. महाराष्ट्रात जो आवाज उठला तर मला खात्री आहे की येऊ घातलेल्या हुकूमशाहीच्या विरुद्ध संपूर्ण हिंदुस्थान उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. या शिवतीर्थावर आपण दसऱ्यावर भेटणारच आहोत, त्यावेळेला आपण बोलणारच. पण आज शिवतीर्थावरून भ्रष्टाचाराची जाळून टाकणारी मशाल महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात घेऊन जा आणि महाराष्ट्राला योग्य दिशा दाखवाल असा विश्वास मी व्यक्त करतो असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
Comments are closed.