IND vs ENG: इंग्लंडमध्ये नेमकं काय झालं? आकाशदीप आणि डकेटच्या वादाचे कारण आले समोर

इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत आकाशदीपने शानदार कामगिरी केली. अवघड परिस्थितीतही त्याने टीम इंडियासाठी उत्तम गोलंदाजी केली. आता इंग्लंडहून परतल्यावर तो आपल्या कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवत आहे. ओव्हलमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा सलामी फलंदाज बेन डकेट याच्यासोबत त्याची शाब्दिक वाद झाला होता. आता आकाशदीपने त्या संभाषणाचा उल्लेख केला आहे.

ओव्हल कसोटी सामन्यात बेन डकेटने आपल्या फलंदाजीदरम्यान आकाशदीपला सांगितले होते की, “तू मला बाद करू शकत नाहीस.” मात्र त्यानंतर थोड्याच वेळात आकाशदीपने डकेटला बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यावेळी जेव्हा डकेट पॅव्हेलियनकडे परतत होता, तेव्हा आकाशदीप त्याच्या खांद्यावर हात ठेवून काही बोलताना दिसला होता. याबाबतचा खुलासा आता या स्टार गोलंदाजाने केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना आकाश म्हणाला, “क्रिकेटच्या मैदानात शांत राहणे गरजेचे असते. मी डकेटला म्हटले, ‘तूच फक्त मारणार नाहीस, मी पण मारेन. कधी कधी तू चुकशील, आणि मी मारून टाकेन.’”

डकेटसोबतच्या वादानंतर आकाशदीपने आपल्या फलंदाजीचा दमदार खेळ दाखवत कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. तो नाईटवॉचमन म्हणून मैदानात उतरला होता. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांना त्याला वेळेत बाद करता आले नाही, आणि त्याने अर्धशतक पूर्ण केले. आकाशदीपने 94 चेंडूत 66 धावांची शानदार खेळी केली, ज्यात त्याने 12 चौकार लगावले. तथापि, गोलंदाजीत तो फारसा चमक दाखवू शकला नाही आणि 2 डावांत फक्त 2 गडी बाद केले.

आकाशदीपने बर्मिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात मात्र कहर केला होता. त्याने पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 6 अशा एकूण 10 बळी घेतले होते. तीन सामन्यांच्या 6 डावांत त्याने एकूण 13 गडी बाद केले.

Comments are closed.