चार दावेदार, जागा दोन! आशिया कपमध्ये कोण करणार टीम इंडियासाठी ओपनिंग? BCCI अन् गौतम पुढे ‘गंभीर
एशिया चषक 2025 साठी टीम इंडिया पथक: इंग्लंड दौरा संपल्यानंतर टीम इंडियाची पुढची मोठी परीक्षा म्हणजे आशिया कप. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून सर्व सामने यूएईमध्ये खेळले जातील. टीम इंडिया आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध खेळेल, तर 14 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध बहुप्रतीक्षित सामना रंगणार आहे. मात्र, या स्पर्धेपूर्वी निवड समितीसमोर मोठं कोडं उभं राहिलं आहे, ते म्हणजे ओपनिंगसाठी कोणाला निवडायचं? कारण शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांचा काही काळापासून टी-20 संघात सहभाग नव्हता.
गिल-यशस्वीचा बराच काळ टी-20 मधून बाहेर…
गिल आणि यशस्वी यांनी शेवटचा टी-20 सामना जुलै 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पल्लेकल येथे खेळला होता. त्यानंतर झालेल्या बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकांमध्ये ओपनिंगची जबाबदारी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनकडे होती. आता गिल-यशस्वी परतले, तर जागा कोणाला मिळणार हा मोठा प्रश्न आहे.
अजीत आगरकर समितीसमोर कठीण आव्हान
सॅमसनने उघड केलं होतं की बांग्लादेश मालिकेपूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याला सात सामन्यांसाठी ओपनिंगची जबाबदारी दिली होती, तीन बांग्लादेशविरुद्ध आणि चार दक्षिण आफ्रिकेविरुद्ध. या सात सामन्यांत त्याने तीन शतके झळकावून स्वतःला सिद्ध केलं. दुसरीकडे, अभिषेक सध्या टी-20चा क्रमांक एक फलंदाज आहे आणि त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे संघाला मोठा फायदा झाला आहे. गिल हा कसोटी संघाचा कर्णधार आहे, तर यशस्वी हा विस्फोटक सलामीवीर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अजीत आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीसमोर योग्य संघ निवडण्याची मोठी जबाबदारी आहे.
सॅमसन-अभिषेकची जोडी रंगात
गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून सॅमसन आणि अभिषेक जोडीने ओपनिंग करत भारताने 12 पैकी 10 टी-20 सामने जिंकले आहेत. सॅमसन केवळ ओपनरच नाही, तर विकेटकीपरची भूमिकाही पार पाडतो. त्याने 42 टी-20 सामन्यांत 152.39 स्ट्राईक रेटने 861 धावा केल्या असून तीन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. अभिषेकने 17 सामन्यांत तब्बल 193.85 च्या स्ट्राईक रेटने 535 धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि दोन अर्धशतके आहेत.
पुढील वर्षी होणार टी-20 वर्ल्ड कप
पुढील वर्षी टी-20 वर्ल्ड कप होणार असल्याने ही यशस्वी सलामी जोडी तोडणं धोक्याचं ठरू शकतं. मधल्या फळीत गिल-यशस्वीला जागा मिळणं अवघड आहे, तिसरा क्रमांक सूर्यकुमारसाठी राखीव, चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा उत्तम कामगिरी करत आहे. पाचव्या क्रमांकापासून पावर-हिटरची भूमिका शिवम दुबे आणि रिंकू सिंगसारखे खेळाडू निभावतात. त्यामुळे गिल-यशस्वी यांची निवड होईल का, हा प्रश्न कायम आहे.
गिलला ओपनिंग, यशस्वीला बेंच?
जर गिल-यशस्वी निवडले गेले, तर गिलला अभिषेकसोबत ओपनिंग देऊन सॅमसनला तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर खेळवलं जाऊ शकतं. गिल आणि अभिषेक एका राज्यासाठी घरगुती क्रिकेट खेळतात, त्यामुळे त्यांची जुळवाजुळव चांगली आहे. अशा परिस्थितीत यशस्वीला बेंचवर बसावं लागू शकतं. गिलने 21 टी-20 सामन्यांत 30.42 च्या सरासरीने आणि 139.28 स्ट्राईक रेटने 578 धावा केल्या आहेत, ज्यात तीन अर्धशतके आणि एक शतक आहे. तर यशस्वीने 23 सामन्यांत 36.15 च्या सरासरीने आणि 164.32 स्ट्राईक रेटने 723 धावा ठोकल्या आहेत, ज्यात पाच अर्धशतके आणि एक शतक आहे.
आणखी वाचा
Comments are closed.