रमी पट्टू, चड्डी बनियान गॅंग आणि डान्सबारवाल्यांची हाकालपट्टी करा, संतप्त शिवसैनिकांचा रत्नागिरीत जनआक्रोश

महाराष्ट्रात महायुती सरकारच्या कारभाराचे दररोज वाभाडे निघत आहेत.रमी खेळताना मंत्री सापडतात. चड्डी बनियानवर आमदार निवासातील कॅंटीनमधील कामगाराला मारहाण करणारे आमदार, गृहराज्यमंत्र्याच्या डान्सबारवर धाड असे प्रकार उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. संतप्त शिवसैनिक आज रस्त्यावर उतरले होते.

राज्यभरात सुरू असलेल्या कथित भ्रष्ट आणि असंवेदनशील सरकारविरोधात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र आंदोलन केले. रत्नागिरीतही आज सकाळी 11 वाजता शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध केला.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखालील या राज्यव्यापी आंदोलनात रत्नागिरीतील शिवसैनिकांनीही सक्रिय सहभाग घेतला. यावेळी, ‘पन्नास खोके, एकदम ओके’, ‘भ्रष्ट सरकारचा निषेध असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

या आंदोलनात कार्यकर्त्यांनी सत्ताधारी नेत्यांच्या अनेक वादग्रस्त विधानांवर आणि कथित घोटाळ्यांवर टीका केली. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचे काय जाते? असे वादग्रस्त विधान करणाऱ्या समाजकल्याण मंत्र्यांवर कारवाई न झाल्याबद्दल रत्नागिरीतील शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच, हे सरकार भिकारी आहे, असे म्हणणाऱ्या मंत्र्यांनाही मंत्रिमंडळात कायम ठेवल्याचा निषेध करण्यात आला.

भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घ्या – बाळ माने

रत्नागिरीतील आंदोलकांनी सत्ताधारी मंत्र्यांच्या अनेक कथित गैरव्यवहारांची यादी सादर केली. यामध्ये समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्यावर 60 कोटींचा आणि 1500 कोटींच्या गैरव्यवहाराचे आरोप, तसेच कृषीमंत्री असताना रमी खेळणारे माणिकराव कोकाटे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबद्दल बोलताना “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे असंवेदनशील विधान करणाऱ्या मंत्र्यांचाही निषेध करण्यात आला.गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावे डान्सबार असल्याचा मुद्दा आणि सत्ताधारी मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे हनीट्रॅप प्रकरणदेखील शिवसैनिकांनी काढून या सर्वमंत्र्याचे राजीनामे घ्यावेत अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी केली. यावेळी उपनेते माजी आमदार बाळ माने, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सहदेव बेटकर, जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, उत्तर जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर उपस्थित होते.

तसेच लोकसभा महिला संघटक नेहा माने, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर,उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस,जिल्हा महिला संघटक वेदा फडके, तालुकाप्रमुख ह्रषिकेश गुजर, शेखर घोसाळे, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तात्या सरवणकर, छोट्या गवाणकर, माजी नगरसेविका रशीदा गोदड, राजश्री शिवलकर, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे,उपतालुकाप्रमुख प्रकाश जाधव, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी , कार्यकर्ते, तसेच महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comments are closed.