Photo – भ्रष्ट मंत्र्यांविरोधात जनआक्रोशाची मशाल पेटली, मुंबईसह राज्यभरात निषेध… निषेध… निषेध!
राज्यातील भाजप-मिंधे व अजित पवार गटाच्या सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात आज जनआक्रोशाची मशाल पेटली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात ‘जनआक्रोश आंदोलन’ करण्यात आले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील प्रत्येक जिह्यात हजारो शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. कुठे पत्ते खेळून, कुठे चड्डी-बनियनवर तर कुठे भोंदूबाबाच्या रूपात शिवसैनिकांनी प्रतीकात्मक आंदोलन करत भ्रष्ट आणि मुजोर मंत्र्यांचे वाभाडे काढले. ‘भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवा… या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय… पन्नास खोके, एकदम ओके…’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
ठाणे –
मिंध्यांचे आमदार संजय गायकवाड यांनी विधान भवनातील पॅन्टीनमधील कर्मचाऱयाला केलेल्या मारहाणीचा ठाण्यातील आंदोलनात निषेध करण्यात आला. बनियन आणि टॉवेलवर येऊन एका आंदोलनकर्त्या व्यक्तीने प्रतीकात्मक डिश्युम डिश्युम करून दाखवले. शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
मुंबई –
मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन पेटले. त्यातून सरकारविरोधातील रोष दिसून आला. भ्रष्ट मंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
मुंबई –
महायुतीतील कलंकित आणि भ्रष्ट मंत्र्यांची तत्काळ हकालपट्टी करावी, म्हणून शिवसैनिकांनी मुंबईत जोरदार आंदोलन केले. अधिवेशनात सभागृहात रमी खेळणाऱया माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. शिवसैनिकांनी ‘रमी’ मंत्र्याचा रस्त्यावर पत्ते खेळून निषेध केला.
नाशिक –
महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यासाठी सोमवारी नाशिकमध्ये जिल्हा शिवसेनेने निषेध आंदोलन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणे धरण्यात आले. भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत निदर्शने करण्यात आली. पैशांच्या बॅगांचे प्रदर्शन करणारे, डान्स बार चालविणारे, आमदार निवासात वेटरला मारहाण करणारे, ग्रामसेवकाला मारहाणीची खुलेआम धमकी देणारे, हनीट्रपचे आरोप झालेले आणि विविध खात्यांत भ्रष्टाचार करून सरकारी तिजोरी लुटणारे मंत्री, लोकप्रतिनिधी महायुती सरकारमध्ये आहेत. त्यांच्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली आहे, बदनामी झाली आहे. त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांची त्वरित हकालपट्टी करावी, भ्रष्ट व कलंकित कारभाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
धुळे –
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री गिरीश महाजन, माणिकराव कोकाटे, योगेश कदम, संजय शिरसाट, भरत गोगावले यांच्या कार्यकर्तृत्वामुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. महाराष्ट्राची असलेली उज्ज्वल परंपरा लक्षात घेता या मत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत. महाराष्ट्र राज्य आणि राज्यातील जनतेची अस्मिता जोपासण्याचे काम मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने पाचही मंत्र्यांचे राजीनामे घेऊन महाराष्ट्राची प्रतिमा जोपासावी, अशी मागणी शिवसेनेने अनोख्या आंदोलनाद्वारे केली.
नागपूर –
भ्रष्टाचारी मंत्र्यांविरोधात शिवसेनेने आज राजकमल चौकात जोरदार जनआक्रोश आंदोलन केले. या आंदोलनात शिवसैनिकांनी प्रतीकात्मक पद्धतीने ‘योगेश भाऊचा डान्स बार’ भरवून योगेश कदम आणि रामदास कदम यांच्यावर खोटय़ा नोटांचा वर्षाव करत तीव्र निषेध व्यक्त केला. ‘नाच कदम नाच’ अशा गगनभेदी घोषणा देत शिवसैनिकांनी योगेश कदम यांचा पुतळा राजकमल चौकामध्ये वाजत-गाजत फिरवला. या आंदोलनात राज्य शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत शिवसैनिकांनी सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केला. आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी खोटय़ा नोटा फेकून कदमांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला मोठय़ा संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. या अनोख्या निषेधाने शिवसैनिकांनी आपला रोष प्रभावीपणे मांडला आणि सरकारला जाब विचारण्याची मागणी केली.
Comments are closed.