पाकिस्तानच्या 'नाक' समोर नौदल व्यायाम
अरबी समुद्रात भारताने केले सामर्थ्याचे महाप्रदर्शन
पाकिस्तानला भरली धडकी…
- भारताच्या नौदल सरावामुळे पाकिस्तानात चिंतेत असल्याचे आले दिसून
- भारताचा सराव दोन तास, महत्वाच्या युद्धनौका, विनाशिकांचा समावेश
- पाकिस्तानचाही सराव 2 दिवस चालणार, दोघांचीही नौदले समोरासमोर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय नौसेनेने आपल्या सामर्थ्याचे दर्शन अरबी समुद्रात पाकिस्तानी सागरी रेषेच्या नजीक घडविले आहे. वायुदलाने सोमवारी अरबी समुद्रातील आपल्या सागरी कक्षेत मोठ्या प्रमाणावर युद्धसराव केला. पाकिस्ताननेही त्याच्या सागरी क्षेत्रात असा सराव केला. पाकिस्तानचा सराव आज मंगळवारीही होणार आहे. भारताने पाकिस्तानी नौदल सरावापासून केवळ 60 सागरी मैलाच्या अंतरावर आपला सराव केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दणका देण्यासाठी हाती घेतलेले ‘सिंदूर अभियान’ संपलेले नसून अद्यापही होत आहे, हे भारताच्या या सरावावरुन स्पष्ट होते, अशी तज्ञांची प्रतिक्रिया आहे.
नोटीस देऊन सराव
आपल्या सरावाला प्रारंभ करण्यापूर्वी भारताने ‘नोटीस टू एअरमेन’ (नोटॅम) देण्याची औपचारिकता पाळली आहे. भारताने आपला नौसेना सराव किती दिवस होत राहणार, यासंबंधी गुप्तता पाळली आहे. तथापि, भारताचा सरावही दोन ते तीन दिवस केला जाईल, अशी शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
भारताचा युद्धाभ्यास 2 तास
भारताने सोमवारी सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 असे दोन तास सराव केला आह. या सरावात भारताच्या सहा युद्धनौका, विमानवाहू नौका आणि काही विकाशिका यांनी भाग घेतला होता. ‘सिंदूर अभियाना’नंतरचा हा भारताचा प्रथम युद्ध सराव होता. या सरावाची सविस्तर माहिती सुरक्षेच्या कारणास्तव प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. तसेच नौदलाकडे असलेल्या क्षेपणास्त्रांचा, किंवा इतर शस्त्रास्त्रांचा समावेश किती प्रमाणात होता, हे देखील स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, महत्वाच्या युद्धनौकांचा समावेश या सखोल सराव होता आणि भारतीय नौदलाच्या युद्धक्षमतेची पडताळणी त्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
परिसरात तणाव
दोन्ही देशांनी जवळजवळ एकाचवेळी युद्धसराव केल्याने या भागात तणावाचे वातावरण होते, असा आरोप करण्यात येत आहे. तथापि, आम्ही आमच्या सागरी मर्यादेतच सराव करणार आहोत, असे दोन्ही देशांनी स्पष्ट केले होते. विशेषत: भारताच्या दृष्टीने हा सराव अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. ‘सिंदूर अभियाना’च्या प्रारंभापासूनच भारत अतिदक्ष स्थितीत आहे. सोमवारच्या नौसेना युद्धाभ्यासाने भारताची हीच सज्जता स्पष्ट झाली, असे मत व्यक्त होत आहे.
राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
भारताने ‘सिंदूर’ अभियान हाती घेतले, तेव्हा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक महत्वाचे वक्तव्य केले होते. पाकिस्तानने पुन्हा दहशतवादी हल्ला केला, तर भारतीय नौदल पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. ‘सिंदूर अभियाना’त भारताच्या नौदलाची सक्रीय भूमिका नव्हती. तथापि, ते युद्धसज्ज स्थितीत ठेवण्यात आले होते. संघर्ष अधिक वाढला असता, तर भारताने नौदलाचा उपयोगही केला असता, असे नंतर स्पष्ट करण्यात आले होते. त्यावेळी भारताने अरबी समुद्रात युद्धनौका आणि शस्त्रास्त्रे सज्ज ठेवली होती.
पंतप्रधान मोदी यांची भेट
‘सिंदूर अभियाना’चा प्रारंभ होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेनाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. ‘पुढच्या वेळी तुम्हाला पराक्रम दाखविण्याची संधी निश्चितपणे मिळेल’ असे वक्तव्य त्यांनी त्या बैठकीत नौसेनेला उद्देशून केले होते, असे वृत्त प्रसारित करण्यात आले होते. त्यामुळे नौसेनेही कोणत्याही क्षणी आक्रमण करण्याची सज्जता ठेवली असून लहान प्रमाणात सरावर सातत्याने केला जात आहे. हा सराव तीन्ही सेनादलांशी संपर्क राखून केला जात आहे.
Comments are closed.