एअर फोर

केंद्र सरकारसमोर वायुदलाची मागणी : एमआरएफए प्रकल्प अंतर्गत नवी राफेल विमाने उपलब्ध करविण्यात यावीत

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

ऑपरेशन सिंदूरदरम्यान जगाने भारतीय वायुदलाचे सामर्थ्य पाहिले आहे. भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानकडील चिनी बनावटीच्या विमानांना धूळ चारली होती. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हाने पाहता भारतीय वायुदलाकडे अद्याप पुरेशा संख्येत लढाऊ विमाने नाहीत. अशा स्थितीत वायुदलाने सरकारकडे नव्या राफेल लढाऊ विमानांची मागणी केली आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित 114 बहुउद्देशीय लढाऊ विमानांच्या (एमआरएफए) प्रकल्पाच्या अंतर्गत नवी राफेल विमाने उपलब्ध करविण्यात यावीत, अशी वायुदलाची इच्छा आहे.

फ्रान्स सरकारसोबत प्रलंबित प्रकल्पाच्या अंतर्गत नवी लढाऊ विमाने खरेदी करण्यात यावीत किंवा तयार केली जावीत, जेणेकरून वायुदलाच्या सामर्थ्यात वाढ होऊ शकेल, असे संरक्षण दलाकडून कळविण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत बहुतांश विमाने विदेशी सहकार्याद्वारे देशातच निर्माण केली जाणार आहेत. याचाच अर्थ भारतीय वायुदल आता स्वत:च्या ताफ्यात भारतात निर्मित राफेल विमान इच्छित आहे.

या प्रकल्पाला पुढे नेण्याचा पहिला टप्पा ऐक्सेपटेन्स ऑफ नेसेसिटी (एओएन) आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषद एक किंवा दोन महिन्यांच्या आत याला मंजुरी देणार असल्याचे समजते. शक्य तितक्या लवकर नवी लढाऊ विमाने ताफ्यात सामील व्हावीत, असे वायुदलाचे सांगणे आहे. 7-10 मे या कालावधीत ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय वायुदलाने सीमापार दहशतवादी अ•dयांना लक्ष्य करण्यासाठी राफेलचा वापर केला होता.

एमआरएफए प्रकल्प मागील 7-8 वर्षांपासून रखडला आहे. तर दुसरीकडे भारतीय वायुदलात लढाऊ विमानांची संख्या कमी झाली आहे. पुढील महिन्यात मिग-21 लढाऊ विमाने वायुदलातून निवृत्त होणार आहेत. अशास्थितीत वायुदलाच्या ताफ्यातील लढाऊ विमानांची संख्या आणखी कमी होणार आहे. भारतीय वायुलाने पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांची देखील मागणी केली आहे.

पाचव्या पिढीच्या विमानांची माण्गी

आता पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांची आवश्यकता असल्याचे भारतीय वायुदलाचे सांगणे आहे. भारतासमोर रशियन बनावटीचे सुखोई-57 आणि अमेरिकेच्या एफ-35 लढाऊ विमानाचा पर्याय आहे. परंतु यावरून सध्या कुठलीही चर्चा सुरू झालेली नाही. दोन्ही देशांच्या सरकारांदरम्यान कराराद्वारे राफेल लढाऊ विमानांची खरेदी झाल्यास हा व्यवहार अधिक लाभदायक ठरेल, असे भारतीय वायुदलाचे सांगणे आहे. 2016 मध्ये भारताने फ्रान्ससोबत 59 हजार कोटी रुपयांचा राफेल खरेदी करार केला होता. यानंतर 36 राफेल लढाऊ विमानांना भारतीय वायुदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आले होते.

वायुदलाकडील विमानांचे प्रमाण

भारतीय वायुदलाला सध्या लढाऊ विमानांच्या 42 स्क्वाड्रन्सची आवश्यकता आहे. सध्या वायुदलाकडे लढाऊ विमानाच्या 29 स्क्वाड्रन्स आहेत. तर पाकिस्तानकडे लढाऊ विमानांच्या 25 स्क्वाड्रन्स आहेत. तर चीनकडे लढाऊ विमानांच्या 66 स्क्वाड्रन्स आहेत. पाकिस्तान आणि चीनकडे पाचव्या पिढीची लढाऊ विमाने देखील आहेत. भारताकडे सर्वात आधुनिक लढाऊ विमान राफेल असून ते 4.5 पिढीचे लढाऊ विमान मानले जाते. याचबरोबर भारतीय वायुदलाच्या ताफ्यात सुखोई, जग्वार तसेच तेजस प्रकारातील लढाऊ विमाने आहेत. पुढील काही काळात देशात निर्मित तेजस लढाऊ विमानांचे ताफ्यातील प्रमाण वाढणार आहे.

Comments are closed.