वैभव सूर्यवंशीला आला बीसीसीआयचा कॉल; टीम इंडियासाठी गुप्त योजना, NCAच्या बंद दारांआड खास प्रशिक्षण

फक्त 14 वर्षांच्या वयात वैभव सूर्यवंशी बीसीसीआयच्या नजरेतला लाडका खेळाडू बनला आहे. बिहारचा रहिवासी असलेल्या वैभवसाठी गेले 6 महिने एखाद्या स्वप्नासारखे गेले आहेत. IPL 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने प्रथम टी20 क्रिकेटमधील सर्वात जलद शतक झळकावले. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यात भारताच्या अंडर-19 संघासाठी जबरदस्त फॉर्म कायम ठेवला. घरी परतल्यावर त्याला बीसीसीआयचा फोन आला आणि 10 ऑगस्ट रोजी त्याला थेट बेंगळुरूतील नॅशनल क्रिकेट अकॅडमी (NCA) मध्ये बोलावण्यात आले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वैभव बीसीसीआयने तयार केलेल्या खास ट्रेनिंग प्रोग्रॅममधून जाणार आहे. यात तांत्रिक ड्रिल्सबरोबरच सामन्यातील विशेष परिस्थितींवरही काम केले जाईल. त्याच्या लहानपणीच्या प्रशिक्षक मनीष ओझा यांनी सांगितले की, बीसीसीआय आधीच या तरुणाला निवृत्ती घेणाऱ्या वरिष्ठ खेळाडूंची जागा घेण्यासाठी तयार करत आहे. ही तयारी फक्त येणाऱ्या ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी नसून, पुढील अनेक वर्षांसाठी आहे. ओझा म्हणाले,”बीसीसीआय पुढे पाहत आहे. वरिष्ठ खेळाडू हळूहळू निवृत्त होत आहेत आणि त्या जागी पुढील पिढीला तयार करणे गरजेचे आहे. वैभवचे हे प्रशिक्षण त्या प्रक्रियेचा भाग आहे.”

बेंगळुरूतील वैभवचे हे प्रशिक्षण फक्त 1 आठवड्याचे असेल. त्यानंतर तो पुढील असाइनमेंटसाठी इंडिया अंडर-19 कॅम्पमध्ये सहभागी होईल. ओझा यांनी हेही सांगितले की, आता या फलंदाजाचे पुढील लक्ष्य दीर्घ फॉरमॅटमध्ये स्थिरता वाढवणे आहे. ते म्हणाले, “त्याच्यात पहिल्याच चेंडूपासून अटॅक करण्याची क्षमता आहे, जी टी20 आणि वनडेमध्ये खूप मोठी जमेची बाजू आहे. तुम्ही ते IPL, अंडर-19 आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये पाहिले आहे. पण लांब फॉरमॅटमध्ये त्याचा परफॉर्मन्स पांढऱ्या चेंडूच्या तुलनेत कमी होतो. लक्ष्य हे आहे की, 10 डावांपैकी 7-8 डावांत त्याने प्रभावी खेळ करावा.”

वैभव सूर्यवंशीला भारतीय क्रिकेटचा नवा चमकता तारा असेच म्हणत नाहीत. फक्त 14 वर्षांच्या वयात इंग्लंडमधील युथ वनडे मालिकेत भारत अंडर-19 संघाकडून खेळताना त्याने 5 वनडेमध्ये एकूण 355 धावा केल्या. या मालिकेत त्याने 30 चौकार आणि 29 षटकार ठोकले. याच दरम्यान फक्त 52 चेंडूत शतक झळकावून युथ वनडेमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम त्याने केला.

Comments are closed.