स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सतर्क

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

देशात पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर आहेत. तर आगामी स्वातंत्र्यदिनापूर्वी दिल्लीत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांनी संभाव्य दहशतवादी हल्ल्याचा धोका पाहता नवी दिल्लीत अलर्ट जारी केला आहे. केंद्रीय यंत्रणांनी संबंधित विभागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दहशतवादी दिल्लीतील घनदाट लोकसंख्या अणि अनधिकृत कॉलनींना लक्ष्य करू शकतात, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना, कट्टरवादी धार्मिक संघटना, खलिस्तानी गट, डावे उग्रवादी (एलडब्ल्यूई) आणि ईशान्येतील काही उग्रवादी संघटनांच्या कारवायांचा धोका असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

गुप्तचर यंत्रणांनी विविध यंत्रणा तसेच निमलष्करी दलाच्या भागीदारीसह सतर्कता वाढविण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला आहे.  कुठलाही बाहेरील व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्रात दाखल होऊ नये हे सुनिश्चित करण्याचा निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. दहशतवादी हल्ला, लोन वोल्फ अटॅक किंवा सरकारच्या धोरणांमुळे प्रभावित समुहांकडून विघटनकारी निदर्शने होण्याचा धोका असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तर सर्व सुरक्षा अधिकाऱ्यांना सोशल मीडियावर पोस्टद्वारे कुठलीही माहिती शेअर न करण्याचा निर्देश देण्यात आला आहे.

पाकिस्तानी हस्तक रचू शकतात कट

पाकिस्तान हस्तक अधिकारी असल्याचे भासवून सुरक्षा व्यवस्था आणि तैनातीच तपशील मिळविण्याचा प्रयत्न करू शकतात. कुठल्याही संशयास्पद व्यक्तीला माहिती उपलब्ध करू नये तसेच कुठल्याही संशयिताने माहिती मिळविण्याचा प्रयत्न केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्याचा निर्देश सर्व नियंत्रण कक्ष कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.

Comments are closed.