खासदार आता विलासी अपार्टमेंटमध्ये राहतात!
दिल्लीतील 184 नव्या फ्लॅटचे उद्घाटन : आधुनिक सुविधांसह हरित तंत्रज्ञानाने सुसज्ज
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
नवी दिल्लीतील बाबा खडक सिंग मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांसाठी बांधलेल्या 184 नवीन फ्लॅटचे उद्घाटन नुकतेच केले. हे सर्व फ्लॅट टाइप-7 दर्जाचे बहुमजली अपार्टमेंट आहेत. सदर चार टॉवर्सना कृष्णा, गोदावरी, कोसी आणि हुगळी अशी अतिशय सुंदर नावे देण्यात आली आहेत. ते लाखो लोकांना जीवन देणाऱ्या भारतातील चार महान नद्यांचे प्रतिनिधित्व करतात. या कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान मोदींनी ‘सिंदूर’चे झाडही लावले. याशिवाय, त्यांनी या अपार्टमेंटची उभारणी करणाऱ्या कामगारांची भेट घेत संवादही साधला. खासदारांसाठी राजधानी दिल्लीमध्ये निवासस्थानांची कमतरता असल्याने हे नवीन फ्लॅट बांधण्यात आले.
मर्यादित जमिनीमुळे येथे उंच इमारती बांधण्यात आल्या असून जागेचा वापर अधिक चांगला होईल आणि देखभाल खर्च कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे. बहुमजली इमारतींमधील फ्लॅटच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधितही केले. या फ्लॅट्समध्ये मोनोलिथिक काँक्रीट आणि अॅल्युमिनियम शटरिंगचा वापर केल्यामुळे इमारत मजबूत झाली. या प्रकल्पाचे काम वेळेवर पूर्ण झाले. उद्घाटन प्रसंगी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार आणि ऊर्जा मंत्री मनोहरलाल, केंद्रीय संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू, गृहनिर्माण समिती (लोकसभा) अध्यक्ष डॉ. महेश शर्मा आणि इतर अनेक खासदार उपस्थित होते.
नवीन फ्लॅट्समध्ये आधुनिक सुविधा
नवीन बांधलेल्या फ्लॅट्सचे हे कॉम्प्लेक्स पूर्णपणे आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. त्यात हरित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या माध्यमातून पर्यावरणपूरक रचना आणि ऊर्जा बचतीचे उद्देश साधण्यात आले आहेत. हा प्रकल्प ‘गृह’ थ्री-स्टार रेटिंगच्या मानकांनुसार आणि 2016 च्या राष्ट्रीय इमारत संहितेच्या नियमांनुसार बांधण्यात आला आहे. प्रत्येक फ्लॅटमध्ये सुमारे 5 हजार चौरस फूट कार्पेट एरिया आहे. त्यामध्ये खासदारांच्या निवासस्थानाची तसेच त्यांचे कार्यालय, कर्मचारी व्यवस्था आणि कम्युनिटी सेंटरची सुविधाही उपलब्ध आहे. सर्व इमारती भूकंप-प्रतिरोधक असून सुरक्षेसाठी मजबूत व्यवस्था करण्यात आली आहे.
खासदारांसाठी निवासाची सुविधा
खासदारांना ज्येष्ठता आणि श्रेणीनुसार घरे वाटप केली जातात. सर्वात लहान प्रकार-1 ते प्रकार-4 घरे केंद्रीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिली जातात. त्यानंतर, प्रकार-6 ते प्रकार-8 पर्यंतचे बंगले आणि घरे केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री आणि खासदारांना दिली जातात. पहिल्यांदाच निवडून आलेल्या खासदारांना सहसा प्रकार-5 बंगले दिले जातात. त्याचवेळी, जर एखादा खासदार एकापेक्षा जास्त वेळा निवडून आला तर त्याला प्रकार-7 आणि प्रकार-8 बंगले देखील दिले जाऊ शकतात. हीच प्रकार-8 निवासस्थाने कॅबिनेट मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, माजी राष्ट्रपती, माजी उपराष्ट्रपती, माजी पंतप्रधान आणि वित्त आयोगाचे अध्यक्ष यांनादेखील दिली जातात.
Comments are closed.