ग्लेन मॅक्सवेलसमोर डेविड वॉर्नरचा विक्रम मोडण्याची संधी; करावे लागेल 'असे' काही
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमधील सुरू असलेल्या T20 मालिकेचा दुसरा सामना 12 ऑगस्ट रोजी मरारा क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दमदार ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलला डेविड वॉर्नरचा एक खास विक्रम मोडण्याची संधी मिळणार आहे. मॅक्सवेलने जर दुसऱ्या T20I मध्ये 2 झेल घेतले, तर तो वॉर्नरला मागे टाकून T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी फील्डर बनेल.
सध्या मॅक्सवेलने 122 T20I सामन्यांत 61 झेल घेतले आहेत, तर डेविड वॉर्नरने आपल्या करिअरमध्ये 110 T20I सामन्यांत 62 झेल घेतले होते. त्यामुळे मॅक्सवेलला वॉर्नरला मागे टाकण्यासाठी 2 झेलांची गरज आहे. पहिल्या T20 सामन्यात मॅक्सवेलचा फलंदाजीत काही विशेष परफॉर्मन्स नव्हता, पण फील्डिंगमध्ये त्याने बाउंड्री लाईनवर एक अप्रतिम झेल घेतला होता.
पहिल्या सामन्यात मॅक्सवेलने 5 चेंडूत फक्त 1 धाव केली. गोलंदाजी करताना त्याने 29 धावा देत 1 बळी घेतला. दुसऱ्या T20 सामन्यात तो फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकला, तर त्याच्याकडे आणखी एक विक्रम करण्याची संधी असेल.
सध्या मॅक्सवेलने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 145 षटकार ठोकले आहेत. दुसऱ्या सामन्यात जर त्याने 5 षटकार मारले, तर तो या फॉरमॅटमध्ये 150 षटकार पूर्ण करणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू बनेल. असे करताच तो T20I मध्ये षटकारांच्या बाबतीत सूर्यकुमार यादव आणि निकोलस पूरनला मागे टाकेल. पूरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून त्याने 97 डावांत 149 षटकार ठोकले आहेत, तर सूर्याकडे सध्या 146 षटकार आहेत आणि तो पुढील महिन्यात होणाऱ्या एशिया कपमध्ये खेळणार आहे.
Comments are closed.