रॉजर फेडरर तीन वर्षांनंतर कोर्टवर उतरणार!

टेनिस विश्वातील महान खेळाडू स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर हा निवृत्तीनंतर तब्बल तीन वर्षांनंतर कोर्टवर उतरणार आहे. त्याच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. टेनिसच्या या महानायकाने यंदाच्या शांघाय मास्टर्स स्पर्धेत खेळणार असल्याचे निश्चित झाले आहे.

रॉजर फेडररने तीन वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली होती. निवृत्तीनंतर प्रथमच तो एवढय़ा मोठय़ा स्पर्धेत खेळणार आहे. 10 ऑक्टोबरला किंझोंग स्टेडियमवर होणाऱ्या ‘रॉजर अॅण्ड फ्रेण्ड्स’ या सेलिब्रिटी डबल्स स्पर्धेत आपण सहभागी होणार असल्याची माहिती स्वतः फेडररने दिली. या विशेष सामन्यात टेनिस आणि मनोरंजनाचा संगम पाहायला मिळणार असून, अभिनेता वू लेई, मार्शल आर्टिस्ट आणि अभिनेता डॉनी येन तसेच माजी जागतिक क्रमांक 3 डबल्स खेळाडू आणि दोन वेळा ग्रँडस्लॅम विजेती झेंग जीए यांचा सहभाग असणार आहे.

फेडरर 2017 नंतर प्रथमच शांघाय मास्टर्समध्ये खेळणार आहे. त्यावेळी त्याने विजेतेपद पटकावून या स्पर्धेतील दुसरे एकेरीचे जेतेपद जिंकले होते. ‘रॉजर अॅण्ड फ्रेण्ड्स’ डबल्स सामना चाहत्यांना सेलिब्रिटी आणि माजी टेनिस ताऱ्यांसोबत फेडररला पुन्हा कोर्टवर पाहण्याची दुर्मिळ संधी देणार आहे. जरी हा प्रदर्शन सामना असला, तरी टेनिस इतिहासातील महान खेळाडूंपैकी एकाच्या पुनरागमनामुळे शांघायमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे आणि त्याच्या भव्य कारकिर्दीचा गौरव साजरा होणार आहे.

प्रोमोशनल व्हिडीओमध्ये फेडरर म्हणाला, हॅलो, मी रॉजर आहे आणि शांघायमधील किझॉन्ग स्टेडियममध्ये रोलेक्स शांघाय मास्टर्ससाठी परत येताना मला खूप आनंद होत आहे. शांघाय नेहमीच माझ्यासाठी खास ठिकाण राहिले आहे. येथे चाहत्यांच्या पाठिंब्यासह अनेक अविस्मरणीय आठवणी आहेत. त्यामुळे येथे खेळण्यासाठी मीदेखील कमालीचा उत्सुक झालोय.

Comments are closed.