शुल्लक कारणावरून ‘सस्पेंड’, पगारही घटवला; उरणमध्ये 103 शिक्षकांनी आरकेएफ शाळेविरोधात उगारली आंदोलनाची छडी

महागाई गगनाला भिडत असताना जेएनपीएअंतर्गत सुरू असलेल्या रुस्तमजी केरावाला फाऊंडेशनच्या (आरकेएफ) शाळा व्यवस्थापनाने शिक्षकांचे पगार कमी केले आहेत. हे कमी पगारही वेळेवर दिले जात नाही. शिक्षकांना हैराण करण्यासाठी किरकोळ कारणांवरून निलंबित केले जात आहे. या छळवणुकीच्या विरोधात या शाळेच्या 103 शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आजपासून शाळेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
जेएनपीएची कामगार वसाहतीमध्ये केजी ते 10 पर्यंत इंग्रजी, मराठी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत 2 हजार 400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. निविदा प्रक्रियेनंतर ही शाळा 1 कोटी 90 लाख इतक्या वार्षिक खर्चावर मालाड येथील रुस्तमजी केरावाला फाऊंडेशनला चालविण्यासाठी देण्यात आली आहे. याआधी हीच शाळा मागील 20 वर्षांपासून जेएनपीएने इंडियन एज्युकेशन सोसायटी या संस्थेला करारावर चालविण्यास दिली होती. शाळेच्या शैक्षणिक बाबींसाठी जेएनपीटी वर्षाकाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च करीत होती. मात्र वाढता शैक्षणिक खर्च कमी करण्यासाठी जेएनपीएने मागील पाच वर्षांपासून ही शाळा आरकेएफ संस्थेला चालविण्यासाठी दिली आहे. दरम्यान, शिक्षकांनी सुरू केलेल्या आंदोलनासंदर्भात आरकेएफ शाळेच्या प्रशासकीय अधिकारी मोनिका रतनपराज यांच्याशी संपर्क साधला. मात्र वारंवार संपर्क करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
उपासमारीची वेळ
या शाळेत मागील 30 वर्षांपासून 106 शिक्षक काम करीत आहेत. मात्र आरकेएफ व्यवस्थापनाने शिक्षकांची छळवणूक सुरू केली आहे. वेतन कपात केली आहे. किरकोळ कारणावरून थेट निलंबन केले जात आहे. शिक्षकांचे वेतन वेळेवर देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सेवानिवृत्तीनंतरही लाभापासून वंचित ठेवण्यात येत आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. वारंवार विनंत्या करूनही शाळा व्यवस्थापनाकडून दुर्लक्षच केले जात असल्याचा गंभीर आरोप शिक्षकांनी केला आहे.
Comments are closed.