कोहली-रोहितचा निवृत्ती निर्णय चुकीचा, आंतरराष्ट्रीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह; आकाश चोप्राची लक्षवेधी प्रतिक्रिया
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीचा शेवट झाला आहे का? दोघांनीही टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, मात्र वनडेमधून अद्याप निवृत्ती घेतलेली नाही. त्यांचे लक्ष आता 2027च्या एकदिवसीय विश्वचषकावर आहे, ज्यात ते 2023च्या अंतिम सामन्यातील चटका देणारी पराभवाची जखम धुवून काढू इच्छितात. जसे त्यांनी टी20 विश्वचषक जिंकून सर्वात लहान फॉरमॅटला अलविदा केले, तसेच वनडे फॉरमॅटलाही तशीच सांगता करायची त्यांची इच्छा आहे.
दरम्यान, माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने सांगितले की दोघांनी चुकीच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. वय आणि फिटनेस लक्षात घेता 2027 पर्यंत फक्त एका फॉरमॅटमध्ये खेळणे दोघांसाठी खूप अवघड ठरेल. एका हिंदी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 वनडे सामन्यांच्या मालिकेनंतर बीसीसीआयकडून त्यांना वनडेमधून निवृत्तीचा सल्ला दिला जाऊ शकतो. तसेच, जर त्यांना 2027 विश्वचषकात खेळायचे असेल तर विजय हजारे ट्रॉफीत भाग घेण्याची अटही घालण्यात येऊ शकते.
आकाश चोप्राच्या मते, विराट आणि रोहित यांनी टी20 नंतर वनडेला अलविदा करायला हवे होते, कसोटीला नाही. दोघांनी जून 2024 मध्ये टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर टी20 मधून, आणि यावर्षी इंग्लंड दौर्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
यूट्यूब चॅनेलवर बोलताना चोप्रा म्हणाला, “दोघांनी चुकीच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. रोहित आणि विराट यांनी अचानक कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. ते म्हणत आहेत की आता ते फक्त वनडे खेळतील. मला याचं दु:ख आहे. कारण टेस्ट क्रिकेट हा सर्वात कठीण फॉरमॅट आहे. व्हाईट बॉल क्रिकेट कंटाळवाणं आहे, पण टेस्ट क्रिकेट तसं नाही. फलंदाजांसाठी टेस्ट हा सर्वात कठीण तर वनडे सर्वात सोपा फॉरमॅट आहे.”
आपला मुद्दा स्पष्ट करताना चोप्रा पुढे म्हणाला, “जर तुम्ही वर्षात फक्त 6 वनडे खेळणार असाल तर तुम्हाला प्रत्यक्षात खेळासाठी फक्त 6 दिवस मिळतील. मग तुम्ही स्वतःला प्रेरित कसं ठेवाल? तयारी कशी कराल? फिट कसं राहाल आणि सर्वोत्तम स्थितीत कसे रहाल? माझ्या मते त्यांनी सांगायला हवं होतं की आम्ही वनडे किंवा टी20 खेळणार नाही, पण कसोटी खेळू. विचार करा, जर तुम्ही इंग्लंडविरुद्धची मालिका खेळली असती, तर तुम्ही 25 दिवस खेळला असता. त्यानंतर वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका असत्या.” असंही तो म्हणाला.
Comments are closed.