शुभमन गिल ठरला ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’
हिंदुस्थानी कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला जुलै महिन्यासाठी ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत केलेल्या दमदार कामगिरीबद्दल त्याला हा सन्मान मिळाला आहे. 25 वर्षीय गिलने जुलै महिन्यातील तीन कसोटी सामन्यांत 94.50 च्या सरासरीने 567 धावा ठोकल्या. यात सहा डावांत दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. हिंदुस्थानचा कसोटी कर्णधार म्हणून हा गिलचा पहिलाच सन्मान होय. गिल म्हणाला, ‘जुलै महिन्याचा आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ होणे खूप आनंदाची गोष्ट आहे. हा मान मला कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी मालिकेतील कामगिरीबद्दल मिळाल्याने अधिकच आनंद झालाय. इंग्लंड दौऱयाच्या आठवणींमध्ये हा क्षण सदैव राहील.’
गिलचा चार वेळा किताब जिंकण्याचा विक्रम
‘आयसीसी’ने 2021 मध्ये ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार देण्यास सुरुवात केली. त्यानंतर शुभमन गिलने हा मान चौथ्यांदा पटकावत विक्रम रचला आहे. त्यामुळे तो हा पुरस्कार सर्वाधिक वेळा जिंकणारा पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे. गिलने या वर्षी फेब्रुवारी महिन्यातही हा सन्मान मिळवला होता, तर 2023 मध्ये जानेवारी व सप्टेंबर असे दोन वेळा हा पुरस्कार पटकावला होता. महिला खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाची अॅश्ले गार्डनर आणि वेस्ट इंड़ीजची कर्णधार हेले मॅथ्यूज यांनीसुद्धा हा पुरस्कार प्रत्येकी चार वेळा जिंकला आहे.
महिलांत इंग्लंडच्या सोफिया डंक्लेला पुरस्कार
इंग्लंडच्या सोफिया डंक्ले हिने जुलै महिन्यात उल्लेखनीय कामगिरी करत पहिल्यांदाच महिला ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार जिंकला. तिने इंग्लंडच्या कर्णधार हिदर नाईटसोबत उत्पृष्ट खेळ करत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
Comments are closed.