क्रिकेटविश्व हादरलं! माजी भारतीय क्रिकेटपटूला ईडीची नोटीस; पाहा नेमकं प्रकरण

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या अडचणी बेटिंग अ‍ॅप प्रकरणात वाढल्या आहेत. 1xBet प्रकरणात चौकशीसाठी रैनाला आज प्रवर्तन संचालनालयाच्या (ED) कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. आपला जबाब नोंदवण्यासाठी तो एजन्सीसमोर उपस्थित राहील, अशी अपेक्षा आहे. यामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे, कारण अनेक क्रिकेटपटू अशा अ‍ॅप्सचा प्रचार करत असतात. अवैध सट्टेबाजी अ‍ॅप्स आणि प्लॅटफॉर्म्सवर सुरू असलेल्या मोठ्या कारवाईचा हा एक भाग असून, अनेक बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप्सचा प्रचार सेलिब्रिटींकडून करण्यात आला आहे.

यावर्षी मे महिन्यात तेलंगणा पोलिसांनी राणा दग्गुबाती आणि प्रकाश राज यांच्यासह 25 मोठ्या कलाकारांविरुद्ध बेटिंग अ‍ॅप्सचा प्रचार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. या दोन्ही अभिनेत्यांनी आपले जबाब नोंदवले असून, त्यांनी कोणताही गैरकृत्य केले नसल्याचे सांगितले आहे. तसेच आता ते अशा प्लॅटफॉर्म्सचा प्रचार करत नाहीत, असेही स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी या अ‍ॅप्सचा प्रचार केला, तेव्हा त्यांचे कॅम्पेन फक्त त्या भागांपुरते मर्यादित होते, जिथे ऑनलाईन स्किल-बेस्ड गेम्सला कायदेशीर परवानगी आहे.

इंडिया टुडेच्या अहवालानुसार, ऑनलाईन सट्टेबाजी प्लॅटफॉर्मच्या कथित अवैध प्रचारासंदर्भातील चौकशीदरम्यान, अभिनेता राणा दग्गुबाती 11 ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये ईडीसमोर हजर झाले. त्यांना आधी 23 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले होते, मात्र चित्रपटाच्या कामामुळे त्यांनी थोडा वेळ मागितला होता. त्यामुळे त्यांची हजेरी 11 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. आता सुरेश रैनाची पाळी आहे.

ईडी एफआयआरमध्ये नमूद असलेल्या इतर काही सेलिब्रिटींच्या आर्थिक व्यवहारांची व डिजिटल पुराव्यांचीही तपासणी करत आहे. यात अभिनेत्री मांचू लक्ष्मी, निधी अग्रवाल, अनन्या नागल्ला आणि टीव्ही अँकर श्रीमुखी यांचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर, 2023 ते 2024 दरम्यान अधिकाऱ्यांनी हाय-प्रोफाइल महादेव ऑनलाईन सट्टेबाजी प्रकरणातही पुढाकार घेतला असून, यात छत्तीसगडमधील वरिष्ठ राजकारणी व नोकरशहांवर आरोप लावण्यात आले आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे नावही आले आहे.

Comments are closed.