ठाण्यात गोविंदा साडेतीन कोटींचे लोणी मटकवणार; कोटीमोलाच्या दहीहंडी फोडण्यासाठी बाळगोपाळ सज्ज

दहीहंडीचा सण अवघ्या चार दिवसांवर आला असल्याने कोटीमोलाच्या दहीहंडी फोडण्यासाठी बाळगोपाळ सज्ज झाले आहेत. दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात यंदा १ हजार ५१० हंड्या फुटणार आहेत. मुंबई, उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील गोविंदा पथके हंड्यांमधील लोणी चाखण्यासाठी येणार असून गोविंदा साडेतीन कोटींचे लोणी मटकवणार आहेत.

‘गोविंदा रे गोपाळा’चा गजर आणि थरांचा थरथराट येत्या शनिवारी ठाणे शहरात पाहायला मिळणार आहे. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील मानाची दहीहंडी, शिवसेना नेते-माजी खासदार राजन विचारे आयोजित आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या जांभळी नाक्यावरील निष्ठेच्या दहीहंडी यासह अनेक नामांकित दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर माँसाहेब मीनाताई ठाकरे चौक, हिरानंदानी मेडोज, वर्तकनगर, नौपाडा, शास्त्रीनगर, रघुनाथनगर, कोपरी, कळवा आणि दिव्यात आयोजकांकडून यंदाही मोठ्या उत्साहात दहीहंडीचा सण साजरा करण्यात येणार आहे.

आदित्य ठाकरे उपस्थित राहणार

आनंद चॅरिटेबल आयोजित जांभळी नाक्यावरील दहीहंडी उत्सवात युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या उत्सवात तब्बल ११ लाखांच्या बक्षिसांचे वाटप गोविंदा पथकांना करण्यात येणार असून यंदाच्या दहीहंडी उत्सवात निष्ठेचे थर उभारले जाणार आहेत.

विश्वविक्रम मोडणाऱ्यांकडे लक्ष

ठाण्यात यापूर्वी नऊ थरांचा विश्वविक्रम गोविंदा पथकांनी केला होता. यंदा हा विश्वविक्रम मोडणाऱ्या पथकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे यंदा नवा विश्वविक्रम होणार असल्याची चर्चा ठाण्यात चांगलीच रंगली आहे.

कल्याण-डोंबिवलीत ‘गोविंदा आला रे आला’

कल्याण-डोंबिवलीत सराव दहीहंडीनिमित्त ‘गोविंदा आला रे आला’च्या गजरात जल्लोष पाहायला मिळत आहे. डोंबिवली पश्चिमच्या सम्राट चौक येथे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने ‘स्वराज्य दहीकाला उत्सव’ मोठ्या धूमधडाक्यात पार पडणार आहे, तर मनसेतर्फे बाजीप्रभू चौकात भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी मुंबईत निष्ठेची हंडी

नवी मुंबई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख विशाल ससाणे आणि उपजिल्हा संघटक पौर्णिमा ससाणे यांच्या माध्यमातून जुईनगर येथील सेक्टर २५ मधील गणेश मैदानात निष्ठा हंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना एकूण १ लाख ११ हजार १११ रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. राधा आणि कृष्णाची वेशभूषा करणाऱ्या मुलांना आकर्षक बक्षिसांचे लोणी या उत्सवात मटकवता येणार आहे.

दहीहंडी उत्सवामुळे शनिवारी ठाणेकरांची वाट अडवली जाणार आहे. या दहीहंडी उत्सवाच्या आयोजनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे वाहतूक शाखेने मुख्य चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. पथकांच्या वाहनांना शहरातील अंतर्गत रस्त्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

पथकांची वाहने पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांवर उभी करता येणार आहेत. तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरून कोपरी, तीन हात नाका, धर्मवीरनगर नाका, नितीन कंपनी येथून ठाणे शहरात वाहतूक करणाऱ्या एसटी, टीएमटी, बेस्ट, एनएमएमटी आणि खासगी बसेसना वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे.

Comments are closed.