मतरवंडमधील लोहऱ्यात बिबट्याने रेडकूचा पाडला फडशा; शेतकऱ्यांमध्ये दहशत

मतरवंडमधील लोहऱ्यात मागील तीन महिन्यापासून बिबट्याने दहशत पसरविली आहे. तालुक्यातील दिघडी, देवसरी ,कारखेड, उंचवडद, चातारी व आता लोहरा परिसरातील शेतकरी पशुपालकांमध्ये दहशत पसरली आहे.

बिबट्याने मंगळवारी रात्री परसिरात दहशत पसरवीत लोहरा येथील एका शेतकऱ्याच्या शेतात बांधून असलेल्या म्हशीच्या रेडकूवर हल्ला करत त्याचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्याने वनपरिक्षेत्र अधिकारी उमरखेड यांच्याकडे तक्रार देत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. संबंधित शेतकऱ्याची तक्रार वनविभागाला प्राप्त होताच वनविभागाच्या कर्मचाऱ्याकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. मागील तीन महिन्यापासून बिबट्याच्या दहशतीने संपूर्ण मतखंड परिसरच हादरून गेला आहे. बिबट्याच्या दहशतीला घाबरून अनेकांनी शेतावर जाणेच बंद केल्याने शेतीतील कामाचा खोळंबा होत आहे.

बिबट्याच्या दहशतीने त्रस्त असलेल्या परिसरातील नागरिकांनी याबाबत वनविभागासह आमदार किसनराव वानखेडे यांच्याकडे तक्रार करून बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी केली होती. यावर बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात येईल असे आश्वासन विद्यमान आमदार आणि वन विभागाने दिले होते. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी दोन पथकाची नेमणूक देखील करण्यात आली. मात्र, बिबट्याच्या बंदोबस्तासाठी नेमणूक केलेल्या पथकाची कामगिरी असमाधानकारक असल्याने आतापर्यंत बिबट्याचा बंदोबस्त करण्यास या पथकाला अपयश आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर काही नागरिकांच्या मते वनविभागाकडून बिबट्याच्या बंदोबस्तासाठी राबविण्यात येत असलेली मोहीम ही केवळ एक स्टंटबाजी असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.

प्रत्येक आठवड्याला हा बिबट्या पशुधनावर ताव मारून मौल्यवान पशुधन फस्त करीत असल्याने पशुपालकांची चिंता वाढली असल्याचे दिसून येत असून याबाबतीत वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी प्रशिक्षित व कार्य तत्पर पथकाची नेमणूक करून दहशत माजवीत असलेल्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतून केली जात आहे.

जंगलातील वाढती असुरक्षितता व अवैध वृक्षतोडीमुळे वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा आता थेट गावकुसात वळविला आहे. अवैध वृक्षतोडीला संबंधित विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून पाय बंद घातला जात नसल्यानेच हिस्त्र वन्य प्राण्यांनी गावकुसात प्रवेश केल्याची चर्चा स्थानिकातून व्यक्त केल्या जात आहे.

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी की संरक्षणासाठी वनविभागाने पथकाची नेमणूक केली असा सवाल देखील नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. दोन महिन्यांपासून बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाला अद्याप पर्यंत बिबट्याला जेरबंद करण्यास अपयश आल्याने नागरिकातून पथकाच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला जात आहे.

Comments are closed.