बेंगळुरूमध्ये वर्ल्ड कप सामने होणे कठीण; 'हे' मैदान असू शकते पर्याय
आयपीएल 2025 चे विजेतेपद RCB संघाने जिंकले होते. त्यानंतर विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये समारंभ आयोजित करण्यात आला. मात्र, त्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता येथे महिला वर्ल्ड कप 2025 चे सामने होणेही कठीण दिसत आहे. कारण कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन (KSCA) 10 ऑगस्टपर्यंत पोलिसांची मंजुरी घेऊ शकलेली नाही. BCCI ने KSCA ला मागील शनिवारीपर्यंत आवश्यक परवानगी घेण्यास सांगितले होते, पण स्थानिक पोलिसांच्या मते मंगळवारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती.
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये महिला वर्ल्ड कप 2025 मधील पहिला सामना 30 सप्टेंबर रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. त्यानंतर 3 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 26 ऑक्टोबरला भारत विरुद्ध बांगलादेश, आणि 30 ऑक्टोबरला दुसरा उपांत्य सामना येथे होणार आहे. मात्र, जर हे सामने येथे न झाल्यास तिरुवनंतपुरममधील ग्रीनफील्ड्स स्टेडियम हा संभाव्य पर्याय म्हणून पुढे आला आहे. केरळ क्रिकेट असोसिएशन (KCA) अधिकाऱ्यांकडून या स्पर्धेच्या वेळापत्रकाबद्दल आणि एका महिन्यात मोठ्या सामन्यांच्या आयोजनाची तयारीबद्दल विचारणा झाली आहे.
ICC च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, यजमान संघाने स्पर्धा सुरू होण्याच्या 30 दिवस आधी मैदान ICC ला सुपूर्द करावे लागते आणि त्या काळात अन्य कोणताही सामना खेळला जाऊ नये. मात्र ग्रीनफील्ड्स स्टेडियम 21 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान केरळ क्रिकेट लीगच्या सामन्यांचे आयोजन करणार आहे. तरीही KCA अधिकाऱ्यांना विश्वास आहे की, जर वर्ल्ड कपचे सामने येथे झाले तर ते T20 सामने इतरत्र हलवतील.
डीकुन्हा आयोगाने चिन्नास्वामी स्टेडियमला मोठ्या कार्यक्रमांसाठी ‘असुरक्षित’ घोषित केल्यानंतर KSCA ला महाराजा T20 ट्रॉफी प्रेक्षकांशिवाय खेळवावी लागली. KSCA अधिकाऱ्यांनी संभाव्य स्थळबदलाबाबत प्रतिक्रिया दिली नाही, पण पोलिसांची मंजुरी मिळवण्यासाठी वर्ल्ड कपचे सामने प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडल्याचे समजते.
Comments are closed.