दादरच्या कबुतर खान्याजवळ मराठी एकीकरण समितीचं आंदोलन; पोलिसांकडून धरपकड, प्रचंड गोंधळ

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ताडपत्री लावून बंद करण्यात आलेल्या दादर येथील कबुतर खान्याच्या बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीने बुधवारी आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाला परवानगी नाकारत पोलिसांनी कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या होत्या. यानंतरही सकाळी कबुतरखाना परिसरामध्ये आंदोलक जमा झाल्याने पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली. यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
कबुतरांना उघड्यावर खाद्य घालण्यास न्यायालयाने बंदी घातल्याने मुंबई महानगरपालिकेने दादर येथील कबुतरखाना बंदिस्त केला. दाणे टाकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पालिकेने सुरक्षा रक्षकही नेमले असून पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला. मात्र न्यायालयाचा आदेश धुडकावत जैन समाज आणि कबुतरप्रेमींच्या मोठ्या जमावाने कबुतरखाना येथे धडक दिली. आक्रमक आंदोलकांनी कबुतरखान्याचे छत तोडत ताडपत्री खाली खेचली आणि बांबूही काढून फेकले. यावेळी प्रचंड गोंधळ उडाला होता. आता हा कबुतर खाना बंद राहिलाच पाहिजे असे म्हणत मराठी एकीकरण समितीने आंदोलन पुकारले आहे.
Comments are closed.