दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस यांचे वडील काळाच्या पडद्याआड, ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळवून दिले होते ब्रॉन्झ पदक

भारतातील दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस यांचे वडील वेस पेस यांचे वयाच्या 80व्या वर्षी निधन झाले. वेस पेस काही काळापासून आजारी होते. कोलकात्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण क्रीडाजगताला धक्का बसला आहे. वेस पेस 1972 म्युनिक ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा सदस्य होते.

वेस पेस यांचा भारतीय क्रीडाक्षेत्राशी दीर्घकाळ संबंध होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंना विविध खेळांमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्यांनी भारतीय हॉकी संघात मिडफिल्डर म्हणून खेळ केला होता. याशिवाय त्यांनी फुटबॉल, क्रिकेट आणि रग्बी सारख्या खेळांमध्येही आपले कौशल्य आजमावले होते.

वेस पेस 1996 ते 2002 या कालावधीत भारतीय रग्बी फुटबॉल संघाचे अध्यक्ष होते. ते एक स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर देखील होते. त्यांनी आशियाई क्रिकेट परिषद, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि भारतीय डेव्हिस कप संघासह अनेक क्रीडा संस्थांमध्ये वैद्यकीय सल्लागार म्हणून काम केले होते.

वेस पेस हे जगातील सर्वात जुन्या क्रीडा क्लबपैकी एक असलेल्या कलकत्ता क्रिकेट आणि फुटबॉल क्लबचे अध्यक्ष देखील राहिले होते. त्यांनी माजी भारतीय बास्केटबॉलपटू आणि बंगाली कवी मायकेल मधुसूदन दत्त यांची पणती जेनिफर डटन यांच्याशी विवाह केला होता. त्यांचा मुलगा लिएंडर पेस यानेही भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. वेस आणि लिएंडर पेस हे भारतातील एकमेव वडील-मुलगा जोडपे आहेत ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकले आहे. लिएंडर पेसने 1996 च्या ऑलिम्पिकमध्ये टेनिस (सिंगल्स) प्रकारात ब्रॉन्झ मेडल जिंकले होते.

Comments are closed.