नांदेडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली अश्लील धंदे, पोलिसांनी धाड टाकत घेतले 5 जणांना ताब्यात

कॅनॉल रोडवरच्या स्पा सेंटरवर भाग्यनगर पोलिसांनी १० दिवसापूर्वी धाड टाकली होती. त्यानंतर काल रात्री वजिराबाद पोलिसांनी भाजी मार्केटच्या इमारतीत चालू असलेल्या द फ्युजन स्पा सेंटरवर धाड टाकली. यामध्ये तीन तरुणी, एक महिला व व्यवस्थापकासह पाच जणांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दहा दिवसापूर्वी नांदेडच्या कॅनॉल रोडवर एका स्पा सेंटरवर धाड टाकून पोलिसांनी तिघा जणांना अटक केली होती व यातील अन्य तीन महिलांची महिला सुधारगृहात रवानगी केली होती. यातील दोन आरोपी अद्यापही पोलिसांना सापडले नाहीत. हे प्रकरण ताजे असताना काल रात्री वजिराबाद पोलिसांनी त्यांना मिळालेल्या गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकासह वजिराबाद भागातील जुन्या भाजी मार्केटच्या इमारतीत सुरु असलेल्या द फ्युजन स्पा सेंटरवर धाड टाकली.

स्पा सेंटरच्या नावाखाली येथे कुंटणखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम व त्यांच्या पथकाने द फ्युजन स्पा सेंटरवर धाड टाकली. त्यावेळी वेगवेगळ्या विचित्र अवस्थेत असलेले ग्राहक त्याठिकाणी आढळून आले तसेच काही पिडीत मुली व महिला देखील आढळून आल्या.

पोलिसांनी धाड टाकून तेथे असलेल्या काही वस्तू जप्त केल्या आहेत. सदरच्या स्पा सेंटरमधील तरुणी दिल्ली, आसाम व अन्य ठिकाणावरुन आल्याची चर्चा सर्वत्र होताना दिसून येत आहे. बाहेर राज्यातून आणल्या जाणार्‍या तरुणीचे रॅकेट कोण चालवितो व त्यांचा प्रमुख सूत्रधार कोण आहे, याची माहिती आता पोलीस घेत आहेत. दरम्यान नांदेड पोलिसांनी स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या कुंटणखान्याचा पर्दाफाश करुन सलग दुसरी कारवाई केल्याने अवैध चालकांचे धाबे दणाणले आहेत.

असा रचला सापळा
वजिराबाद पोलिसांना दोन-तीन दिवसापासून या प्रकरणाची पूर्ण माहिती मिळाली होती. त्यानुसार काल रात्री तीन बनावट ग्राहक वजिराबाद पोलिसांनी तयार केले व त्यांच्याकडे काही रक्कम दिली. त्यांना तेथे पाठविण्यात आले. भाजी मार्केटच्या शटर क्र.१३३ मध्ये द फ्युजन स्पा नावाच्या मसाज सेंटरमध्ये त्यांना पाठविण्यात आले. तेथील व्यवस्थापकाशी संपर्क करुन त्यांना विश्वासात घेतले. त्यानंतर त्याठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री झाल्यानंतर खाजगी वेषातील पोलिसांनी धाड टाकून तीन मुली, एक महिला व व्यवस्थापक यांना ताब्यात घेतले. काही ग्राहक देखील तेथे होते. ते यावेळी पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्या ठिकाणावरुन अवैध साहित्य, मसाज रेटकार्ड, लाल रंगाचे रजिस्टर, फोन पे चे क्युआर कोड फलक आदींची जप्ती करुन त्याचा पंचनामा करण्यात आला.

पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी सांगितले की, या प्रकरणात तीन पिडीत तरुणी, एक महिला व व्यवस्थापक या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Comments are closed.