युवराज सिंग गिलच्या इंग्लंडमधील कामगिरीवर खुश! जाणून घ्या काय म्हणाला?

शुबमन गिलसाठी (Shubman gill) कसोटी कर्णधार म्हणून पहिलीच मालिका अतिशय संस्मरणीय ठरली. इंग्लंडच्या मैदानावर गिलने केवळ आपले कर्णधार पद नव्हे तर फलंदाजीचीही जोरदार छाप सोडली. 5 सामन्यांत त्याच्या बॅटमधून तब्बल 754 धावा आल्या. घराबाहेर धावा काढण्याची क्षमता नाही, असा दावा करणाऱ्या टीकाकारांच्या तोऱ्याला त्याने आपल्या कामगिरीने चोख उत्तर दिले.

पाच सामन्यांची ही मालिका टीम इंडियाने 2-2 अशी बरोबरीत संपवली. भारताचा माजी फलंदाज युवराज सिंग (Yuvraj Singh) देखील गिलच्या खेळीने आणि नेतृत्वाने भारावून गेला. आयसीसीशी बोलताना युवराज सिंग म्हणाला, गिलच्या घराबाहेरील खेळीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत होते. पण हा मुलगा कर्णधार बनला आणि चार शतकं ठोकली. ही कामगिरी अप्रतिम आहे. जबाबदारी मिळाल्यावर ती कशी पार पाडतो, हे महत्त्वाचं असतं आणि गिलने ते दाखवून दिलं.

युवीने गिलच्या तरुण ब्रिगेडचंही कौतुक केलं. तो म्हणाला, मला या टीमचा खूप अभिमान आहे. मालिका ड्रॉ झाली असली तरी माझ्या मते ही जिंकण्याइतकंच मोठं यश आहे. कारण ही एक तरुण टीम आहे. इंग्लंडमध्ये जाऊन स्वतःला सिद्ध करणं सोपं नसतं.

भारत-इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शेवट 2-2 अशा बरोबरीत झाला. पहिल्या टेस्टमध्ये हेडिंग्ले येथे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र एजबेस्टनमध्ये गिलच्या संघाने जोरदार पुनरागमन करत इंग्लंडला चांगलाच धक्का दिला.

लॉर्ड्स कसोटी सामन्यात यजमानांनी बाजी मारली, तर चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी सामना ड्रॉ करण्यात यश मिळवलं. ओव्हलमध्ये मात्र भारतीय गोलंदाजांनी अफलातून प्रदर्शन करत हरलेला सामना जिंकून दाखवला. मोहम्मद सिराज (Mohmmed Siraj) आणि प्रसिद्ध कृष्णा (prasiddh krishna) यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने ओव्हल टेस्टमध्ये विजय मिळवला.

Comments are closed.