बाबर-रिजवानकडून फक्त जाहिरातीच करून घ्या! पाकिस्तानच्या दोन स्टार फलंदाजांवर माजी खेळाडूचा संताप
पाकिस्तानला अलीकडे वेस्ट इंडिजकडून मोठा धक्का बसला. तब्बल 34 वर्षांनी कॅरिबियन संघाने पाकिस्तानकडून वनडे मालिका हिसकावून घेतली. मालिकेच्या निर्णायक सामन्यात पाकिस्तानचा फलंदाजी क्रम ताशाच्या पत्त्यांसारखा कोसळला. 295 धावांचे लक्ष्य पाठलाग करताना संपूर्ण संघ अवघ्या 92 धावांत गारद झाला.
या मालिकेत ना बाबर आझम (Babar Azam) काही विशेष करू शकला, ना कर्णधार मोहम्मद रिजवानचा (Mohmmed Rizwan) बॅट चालली. या दोघांच्या सततच्या खराब कामगिरीवर माजी खेळाडू बासित अली (Basit Ali) यांनी जोरदार टीका केली. ‘गेम प्लॅन’ या कार्यक्रमात बोलताना बासित अली म्हणाले, हे दोघे त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला केलेल्या चांगल्या कामगिरीवर जगत आहेत. आता यांच्याकडून फक्त जाहिराती करून घ्या. हे कोचचं ऐकत नाहीत, बॅटिंग कोच काही सांगितलं तरी ऐकण्याचा केवळ दिखावा करतात. यांना एखादा असा व्यक्ती हवा, जो त्यांचे डोळे उघडेल. यांना इंजमाम, युसूफ किंवा युनिस खानसारख्या व्यक्तींची गरज आहे. त्यांनी पुढे म्हटलं की बाबरने मैदानावर उतरतानाच आपला अहंकार विसरायला हवा.
बाबर आझमचा (Babar Azam) आवडता फॉरमॅट वनडे क्रिकेट मानला जातो, पण त्याने या फॉरमॅटमध्ये शतक ठोकून बराच काळ झाला आहे. बाबरने शेवटचं वनडे शतक ऑगस्ट 2023 मध्ये केलं होतं. त्यानंतर तो धावांसाठी झगडताना दिसला आहे. या वर्षी खेळलेल्या 11 सामन्यांत बाबरने फक्त 30 च्या सरासरीने 334 धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राइक रेटही फक्त 78 आहे. त्याचप्रमाणे, रिजवाननेही गेल्या दोन वर्षांत फक्त एकच शतक झळकावलं आहे.
Comments are closed.