संजू सॅमसनचा राजस्थानला रामराम; 'हे' प्रकरण ठरलं निर्णायक

गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटविश्वात संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स सोडून चेन्नई सुपर किंग्समध्ये सामील होण्याच्या चर्चेला जोर आला आहे. काही दिवसांपूर्वीच सॅमसनने राजस्थान व्यवस्थापनाकडे स्वतःला रिलीज करण्याची औपचारिक विनंती केली होती. मात्र, चाहत्यांच्या मनात सतत हा प्रश्न आहे की कर्णधार असूनही सॅमसन राजस्थानपासून का वेगळे होऊ इच्छितात.

खरं तर, मागील IPL सिझन संपता-संपता सॅमसन आणि राजस्थान यांच्यात काही गंभीर मतभेद झाले होते. त्यातील एक मोठं कारण म्हणजे इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला रिलीज करण्याच्या निर्णयावर दोघांचं एकमत न होणं. सॅमसन आणि व्यवस्थापनामध्ये या विषयावर तीव्र वाद झाला, पण शेवटी राजस्थानने बटलरला सोडून देणं पसंत केलं.

रिपोर्टनुसार, “सॅमसनने राजस्थानला कळवलं होतं की ते आता नवीन संघात जाण्याचा विचार करत आहेत. RR आणि सॅमसन यांच्यातील मतभेदांपैकी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बटलरला रिलीज करण्याचा निर्णय होता.” या महिन्याच्या सुरुवातीला सॅमसनने सार्वजनिकरित्या बटलरला रिटेन न करण्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. बटलर मागील 7 वर्षांपासून राजस्थानसोबत होता, पण गेल्या वर्षी मेगा ऑक्शनपूर्वी राजस्थानने त्याला रिलीज केलं.

मागील IPL सिझनदरम्यान मिडीयाशी बोलताना सॅमसन म्हणाले होते, “बटलरला रिलीज करणं हे माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण निर्णयांपैकी एक होतं. इंग्लंड सिरीजदरम्यान डिनरला बसलो असताना मी त्याला सांगितलं की मी अजूनही यावरून सावरलेलो नाही. आणि जर मला IPL मध्ये एक गोष्ट बदलण्याची संधी मिळाली, तर मी दर 3 वर्षांनी खेळाडूंना रिलीज करण्याचा नियम बदलला असता.”

Comments are closed.