पाकिस्तानने आपली जीभ नियंत्रित केली पाहिजे!

मुनीर-शाहबाज शरीफ यांच्या धमक्यांना भारताने चोख प्रत्युत्तर

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताकडून दारुण पराभव पत्करलेला पाकिस्तान भारताविरुद्ध द्वेषपूर्ण आणि युद्धजन्य वक्तव्ये करण्यापासून परावृत्त होताना दिसत नाही. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर, पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी अलिकडेच भारताला पोकळ धमक्या दिल्या होत्या. भारताने यावर प्रत्युत्तर देत पाकिस्तानी नेत्यांना त्यांच्या जिभेवर नियंत्रण ठेवण्यास सांगितले आहे. भारताने पाकिस्तानच्या भडकाऊ विधानावर तीव्र आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानने विनाकारण आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्यांना वेदनादायक परिणाम भोगावे लागतील, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे वरिष्ठ नेते भारताबद्दल अनेक प्रकारची विधाने करत आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अलिकडेच अमेरिकेच्या दौऱ्यावेळी भारताला अणुबॉम्बची धमकी दिली होती. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही ‘आपला देश भारताला त्यांच्या हक्काचा एक थेंबही पाण्यावर नियंत्रण ठेवू देणार नाही’, असे म्हटले होते. भारताने पाकिस्तानच्या या धमक्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आपले अपयश लपवण्यासाठी अशी भडकाऊ विधाने करणे ही पाकिस्तानच्या नेतृत्वाची सवय असल्याचे भारताचे म्हणणे आहे. अलिकडच्या काळात पाकिस्तानने केलेल्या टिप्पण्या भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अपयशांवरून लक्ष विचलित करण्याच्या ज्ञात पद्धतीचा भाग म्हणून वर्णन केल्या आहेत.

पाकिस्तानी नेतृत्वाने भारताविरुद्ध केलेली वक्तव्ये, युद्ध भडकवणाऱ्या आणि द्वेषपूर्ण टिप्पण्यांबद्दलचे वृत्त आम्ही पाहिले आहे. आपले अपयश लपविण्यासाठी वारंवार भारतविरोधी वक्तव्य करणे ही पाकिस्तानी नेतृत्वाची एक सुप्रसिद्ध पद्धत असल्याचेही जयस्वाल यांनी म्हटले आहे.

‘तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल’

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एका ब्रीफिंगमध्ये भारताची भूमिका स्पष्ट केली. पाकिस्तानला त्यांच्या वक्तव्यात संयम बाळगण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच कोणत्याही चुकीच्या कृतीचे भविष्यात दु:खद परिणाम होतील. भारताने यापूर्वी पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे आपली कृती दाखवून दिली होती. आता पुन्हा त्यापेक्षाही गंभीर परिणाम होतील, असा सज्जड दम भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.

Comments are closed.