'बब्बर खालसा' षड्यंत्र नाकारले

स्वातंत्र्यदिनापूर्वी दोन दहशतवाद्यांना हँडग्रेनेडसह अटक : पंजाबमध्ये सरकारी कार्यक्रमात घातपाताचा प्रयत्न फसला

वृत्तसंस्था/अमृतसर

पंजाबमध्ये स्वातंत्र्यदिनापूर्वी एक मोठा दहशतवादी हल्ला टळला. काउंटर इंटेलिजेंस फिरोजपूरने एका गुप्त कारवाईत बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) च्या दोन सक्रिय दहशतवाद्यांना अटक केली. या कारवाईच्या माध्यमातून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय समर्थित हरविंदर रिंडाच्या मॉड्यूलचा कट उधळला. अटक केलेल्या आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. हरप्रित सिंग उर्फ प्रीत (राहणार – तरनतारन) आणि गुलशन सिंग उर्फ नंदू (राहणार – अमृतसर) अशी संबंधितांची नावे आहे. त्यांच्या ताब्यातून दोन 86पी हँडग्रेनेड, एक 9 एमएम पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात हे दोघेही आरोपी ब्रिटन, अमेरिका आणि युरोपमध्ये बसलेल्या परदेशी हँडलर्सच्या सूचनांनुसार काम करत होते, असे डीजीपी गौरव यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ग्रेनेडने सरकारी आणि पोलीस संस्थांना लक्ष्य करून सीमावर्ती भागात दहशत आणि अस्थिरता पसरवणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. ठोस गुप्त माहितीनंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांचा ताबा मिळवला असून चौकशीदरम्यान देशांतर्गत आणि परदेशी नेटवर्कचे महत्त्वाचे खुलासे अपेक्षित आहेत. दोन दिवसांपूर्वी, पंजाब पोलिसांनी राजस्थानच्या टोंक आणि जयपूर जिह्यातून पाच आरोपींना (तीन अल्पवयीन मुलांसह) अटक करून आणखी एक बीकेआय मॉड्यूल उघडकीस आणले होते. त्यांच्याकडून एक हँडग्रेनेड आणि पिस्तूल जप्त करण्यात आले होते. या कारवायांच्या माध्यमातून सीमेपलीकडून पंजाबमध्ये दहशतवादी नेटवर्क पुन्हा सक्रिय करण्याचे प्रयत्न तीव्र झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Comments are closed.