पाथर्डीत शंभरहून अधिक मतदारांच्या दुहेरी, तिहेरी नोंदी

प्रतिकृती फोटो

पाथर्डी तालुक्यातील मुंगूसवाडे गावातील मतदार यादीमधील घोटाळा उघडकीस आला आहे. गावातील अनेक मतदारांची नावे ही मुंगूसवाडे ग्रामपंचायतीसह राज्यातील दोन ते तीन मतदारसंघांत असल्याचे दिसून येत आहे.

या गावातील रोहिदास पुंजा हिंगे, विठ्ठल पुंजा हिंगे, मंदाबाई विक्रम हिंगे, राम सुखदेव सुपेकर, शिवाजी दिनकर शेळके, मारुती रावसाहेब पवार, सुदामती महादेव माने यांच्यासह अनेक मतदारांची नावे मुंगूसवाडे ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत असताना, या सर्वांचीच नावे पुणे जिह्यातील वारजे, वडगाव शेरी, बावधन, खडकवासला या भागांतील मतदार याद्यांमध्येही दिसून येत आहेत.

गावातील एक मराठी दहा वर्षांपासून मुंगूसवाडे ग्रामपंचायतीचा सदस्य असतानाही त्याचे नाव हे पुण्यातील दोन मतदारसंघांत असल्याने त्याला तीन ठिकाणी मतदान करण्याचा हक्क मिळाला आहे. एका ग्रामपंचायत सदस्याचे नाव मुंगूसवाडे आणि पुणे अशा दोन ठिकाणी मतदार यादीत आहे. मुंगूसवाडे ग्रामपंचायतची एकूण मतदार संख्या दोन हजारांहून अधिक आहे. यातील अनेक मतदार हे दुसऱ्या ठिकाणच्याही मतदार यादीत असून, ते तेथेही मतदान करत असल्याचे दिसून येते.

मुंगूसवाडे गावातील काही ग्रामस्थ हे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी विविध शहरांत व्यवसायासाठी, तर काही जण नोकरीच्या निमित्ताने गेले आणि त्यांनी तेथील मतदार यादीत आपले नाव नोंदवले. तसेच, गावातील मतदार यादीतही आपले नाव कायम ठेवले. त्यावेळी दोन्हीही मतदारसंघांतील तत्कालीन निवडणूक शाखेचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पुरेशी दक्षता न घेतल्याने हा गोंधळ झाला असला तरीही निवडणूक आयोगाच्या कामकाजाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असाच प्रकार तालुक्यातील अनेक गावांत असून, या बोगस मतदार यादीत काही सरकारी नोकर व अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याने निवडणूक आयोगाच्या कामकाजाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या घोटाळ्याविषयी बोलताना काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नासिर शेख म्हणाले, निवडणूक आयोगाचा हा घोळ अत्यंत गंभीर असून, इंडिया आघाडीच्या नेत्यांची निवडणूक आयोगाविषयीची संशयास्पद भूमिका खरी ठरली आहे. लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी संघर्ष करणार आहेत. या घोळाचा महाविकास आघाडीला मोठा फटका बसला असून, त्यामुळे अनेक उमेदवार पराभूत झाले आहेत. येत्या काळात या संदर्भाचा आमचा लढा सुरू राहणार आहे.

Comments are closed.