हत्तीकडून नुकसानीचा खेळ पुन्हा सुरू; चाळोबा जंगलातून हत्ती चित्री प्रकल्प परिसरात दाखल, रोपलावणीच्या भाताचे नुकसान

आजरा तालुक्याच्या पूर्व भागातून चित्री प्रकल्प परिसरात काही दिवसांपूर्वी परतलेल्या हत्तीकडून नुकसानीचा खेळ पुन्हा सुरू झाला आहे. चित्री प्रकल्प परिसरातील गावांच्या शेतातील भाताच्या रोपलावणी हत्तीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. त्यामुळे विशेषतः येथील विटे आणि खानापूरमधील भात शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच चाळोबा जंगलातून तालुक्याच्या पूर्व भागात गेलेला गणेश हत्ती चित्री प्रकल्प क्षेत्रातील इटे येथे दाखल झाला आहे. या हत्तीने आपला मोर्चा परिसरातील खानापूर गावच्या भातपिकांकडे वळवला आहे. दिवसभर चाळोबा जंगलात राहणे आणि सायंकाळी शेतात उतरून भातरोपांचे नुकसान करण्याचे तंत्र आताही दिसून येत आहे.
कालपासून खानापूर येथील बाबूराव गुरव, कृष्णा जाधव, भागोजी जाधव, कृष्णा दोरुगडे, रामदास पाटील, रुजाय कुतिनो, गौतम कांबळे आदी शेतकऱ्यांच्या रोपलावणीच्या भाताचे त्याने मोठे नुकसान केले आहे.
या परिसरातील चाळोबाचे घनदाट जंगल वास्तव्यास, खानापूर तलाव व चित्री प्रकल्प डुंबण्यास आणि नजीकच्या शेतातील पिके पोट भरण्यास मदतकारक ठरल्याने हत्ती या परिसरात ठिय्या मांडून असतो. खाण्यापेक्षा त्याच्या वावरण्यातून मोठे नुकसान होत असल्याचे पीडित शेतकरी बाबूराव गुरव व माजी सरपंच विश्वास जाधव यांनी सांगितले. दरम्यान, हत्तीने नुकसान केलेल्याचे पंचनामे करण्यास वन विभाग कर्मचारी दाखल झाले. पण हत्ती येथे वास्तव्य करणे आता शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी होणार असल्याने वन विभागाकडून त्याचा बंदोबस्त व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Comments are closed.