मागितले हजार कोटी, मिळाला भोपळा; पालकमंत्र्यांची झोळीच फाटकी!

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पाडापाडी केलेले रस्ते पुन्हा नवे करण्यासाठी हजार कोटी रुपये मागितले. मात्र उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्र्यांच्या झोळीत एक पैसाही टाकला नाही. उलट हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी करा, नंतर विचार करू, असे सुनावले. अजितदादांनी हिवाळी अधिवेशनाचा उल्लेख केल्याने आता शहरातील पाडापाडी केलेल्या रस्त्यांच्या कामांना नव्या वर्षातच मुहूर्त मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गणेश महासंघाच्या कार्यालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमात पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शहरातील पाडापाडी करण्यात आलेल्या रस्त्यांसाठी एक हजार कोटी रुपये देण्याची मागणी पवारांकडे केली. मात्र अजित पवारांनी एक छदामही देऊ केला नाही. उलट पाणीपुरवठा योजनेच्या कामाची लक्तरेच काढली. जलवाहिनी टाकताना ती रस्त्याच्या कडेला टाकली पाहिजे याचेही साधे भान ठेवण्यात आले नाही. शहरातील रस्ते कसे आहेत याचा अनुभव मी आताच घेतला. ३० कोटी रुपये खर्चुन तयार केलेला रस्ता मी पाहिला. त्यावरून शहरातील इतर रस्त्यांची काय अवस्था असेल याची कल्पना येते, आणि तरीही पैसे मागता ? असे म्हणत अजितदादांनी पालकमंत्र्यांची खरडपट्टी काढली. अतिक्रमणे काढताना थोडीतरी माणूसकी ठेवायला पाहिजे, ती माणसेही आपलीच आहेत असे खडे बोलही अजितदादांनी सुनावले.
पाडापाडी करण्यात आलेले शहरातील रस्ते निश्चितच केले जातील, पण त्यासाठी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी मांडावी लागेल. त्यावर नक्कीच विचार करू अशा वाटाण्याच्या अक्षता अजितदादांनी लावल्या त्यामुळे चिकलठाणा, मुकुंदवाडी, पैठणरोड, पडेगाव या रस्त्याचे नशिब उजाडायला नवे वर्ष उगवावे लागणार हे स्पष्ट झाले आहे.
Comments are closed.