15 ऑगस्टला भारताचा विजयी जल्लोष, विराट कोहलीची अफलातून खेळी
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळाले. मात्र, भारत याआधीपासूनच क्रिकेट खेळत होता. पण 1947 नंतर या दिवसाला एक वेगळीच ओळख मिळाली. त्यानंतर फारच कमी वेळा असे झाले आहे की भारतीय क्रिकेट संघाने 15 ऑगस्टच्या दिवशी एखादा सामना खेळला आहे. 2019 साली असाच एक प्रसंग आला होता, जेव्हा भारतीय संघाने स्वातंत्र्याच्या महापर्वाच्या दिवशी वेस्ट इंडिजला चांगलीच धूळ चारली होती आणि विराट कोहलीने शतक झळकावले होते.
ही गोष्ट आहे 2019 ची, जेव्हा टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौर्यावर होती. या मालिकेतील तिसरा वनडे सामना 14 ऑगस्टला सुरू झाला होता, मात्र भारत आणि वेस्ट इंडिजच्या वेळेत बराच फरक असल्याने तो भारतीय वेळेनुसार 15 ऑगस्टला संपला. सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे झाला होता. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 35 षटकांत 7 गडी गमावून 240 धावा केल्या होत्या. पावसामुळे सामना कमी षटकांचा ठेवण्यात आला होता.
वेस्ट इंडिजकडून केवळ सलामीवीर क्रिस गेलने तुफानी फलंदाजी केली. त्याने 41 चेंडूत 72 धावा केल्या, ज्यात 8 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. त्याच्याशिवाय इतर कोणताही फलंदाज फारसे काही करू शकला नाही. दुसरा सर्वाधिक स्कोअर इव्हिन लुईसचा होता, त्याने 29 चेंडूत 43 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर रोहित शर्मा फक्त 10 धावा करून माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार विराट कोहलीला शिखर धवनची साथ मिळाली. विराट कोहलीने केवळ 99 चेंडूत 114 धावांची धमाकेदार खेळी केली. श्रेयस अय्यरनेही 65 मौल्यवान धावा केल्या. सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात 256 धावा केल्यावर डकवर्थ-लुईस नियमाने सामना संपवण्यात आला आणि भारताने हा सामना 6 गडी राखून जिंकला.
Comments are closed.