भारताने ऑस्ट्रेलियाला रोमांचक सामन्यात नमवले, टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा
भारतीय महिला अ संघाने आणखी एका सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला अ संघावर विजय मिळवला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यातही भारताने विजय मिळवला होता. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेवर भारताने आता कब्जा मिळवला आहे. दुसरा सामना भारताने दोन गडी राखून जिंकला आणि तो अतिशय रोमांचक ठरला. शेवटची एकच चेंडू शिल्लक असताना भारताने विजय निश्चित केला.
भारतीय महिला अ संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. पहिला सामना जिंकून भारताने आघाडी घेतली होती. दुसऱ्या सामन्यातही विजय मिळवून मालिकेवर शिक्कामोर्तब केले. या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला अ संघाने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 9 गडी गमावून 265 धावा केल्या. भारतासमोर 266 धावांचे मोठे लक्ष्य होते. ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येत एलिसा हीलीचा मोठा वाटा होता. तिने 87 चेंडूंवर 91 धावा केल्या. शतक थोडक्यात हुकले, मात्र संघाला मोठा स्कोर मिळवून देण्यात ती यशस्वी ठरली.
भारताच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. शेफाली वर्मा केवळ 4 धावा करून माघारी परतली. त्यानंतर धरा गुज्जरही खाते न उघडता बाद झाली. मोठा स्कोर चेस करताना लवकर दोन गडी गेल्यामुळे टीम इंडियासाठी आव्हान वाढले.
नंतर यस्तिका भाटियाने डाव सावरला. तिने 71 चेंडूंवर मौल्यवान 66 धावा केल्या. सहाव्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार राधा यादवने 78 चेंडूंवर अप्रतिम 60 धावांची खेळी करत संघाला परत खेळात आणले. एका टप्प्यावर भारत पिछाडीवर असताना राधाच्या फलंदाजीनेच आशा निर्माण केल्या.
भारताच्या विजयात तनुजा कंवरचा मोठा वाटा होता. तिने 57 चेंडूंवर नाबाद 50 धावा करून संघाला विजयाच्या दारापर्यंत नेले. प्रेमा रावतनेही 33 चेंडूंवर 32 धावा करत शेवटपर्यंत नाबाद राहून संघाला रोमांचक विजय मिळवून दिला.
Comments are closed.