क्रिकेट विश्वावर शोककळा! भारतीय संघाचे मार्गदर्शक, ऑस्ट्रेलियाचा आधारस्तंभ काळाच्या पडद्याआड

बॉब सिम्पसनचे वय 89 वयाचे आहे: ऑस्ट्रेलियन क्रिकेटविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार बॉब सिम्पसन यांचे 16 ऑगस्ट (शनिवार) रोजी सिडनी येथे निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. खेळाडू, कर्णधार आणि प्रशिक्षक या तिन्ही भूमिकांमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटला मोठे योगदान दिले. सिम्पसन यांची ओळख अशा क्रिकेटपटूंमध्ये होते, ज्यांनी कठीण काळातून ऑस्ट्रेलियाला बाहेर काढून आणि जागतिक दर्जाची टीम बनवली. विशेष म्हणजे, 1999 च्या वनडे वर्ल्ड कपदरम्यान ते भारतीय संघासोबत कन्सल्टंट म्हणून जोडले गेले होते.

खेळाडू म्हणून कारकीर्द

बॉब सिम्पसन यांनी ऑस्ट्रेलियासाठी 62 कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी 46.81 च्या सरासरीने 4869 धावा केल्या, ज्यामध्ये 10 शतकं आणि 27 अर्धशतकं सामावलेली होती. 1964 मध्ये मँचेस्टर कसोटीत त्यांनी इंग्लंडविरुद्ध 311 धावांची ऐतिहासिक खेळी साकारली होती, जी अ‍ॅशेस मालिकाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळ्यांपैकी एक मानली जाते. त्यांनी 2 एकदिवसीय सामनेही खेळले, ज्यात 36 धावा केल्या. ते उत्कृष्ट स्लिप फिल्डर आणि उपयुक्त लेगस्पिन गोलंदाज होते. कसोटीत त्यांनी 71 तर वनडेमध्ये 2 बळी घेतले.

सिम्पसन यांनी 1968 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, केरी पॅकर वर्ल्ड सिरीजच्या काळात संघ संकटात असताना त्यांनी पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाचे नेतृत्व केले. डिसेंबर 1957 मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग कसोटीत पदार्पण केले होते, तर एप्रिल 1978 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्स्टन येथे आपला अखेरचा कसोटी सामना खेळला. तोच त्यांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.

कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून योगदान

सिम्पसन यांनी ऑस्ट्रेलियाचे 39 कसोटी सामन्यांत नेतृत्व केले. त्यात 12 विजय, 12 पराभव आणि 15 सामने बरोबरीत सुटले. त्यांच्या नेतृत्वाखाली दोन वनडे सामने झाले, ज्यात एक विजय आणि एक पराभव मिळाला. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर त्यांनी प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारली. 1986 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर त्यांनी तरुण संघात नवी उर्जा ओतली. कर्णधार ऍलन बॉर्डर आणि प्रशिक्षक सिम्पसन या जोडीने 1987 मध्ये ऑस्ट्रेलियाला पहिला वनडे वर्ल्ड कप जिंकवून दिला. पुढे 1989 मध्ये इंग्लंडला हरवून अ‍ॅशेस जिंकले, तसेच 1995 मध्ये वेस्ट इंडिजच्या भूमीवर कसोटी मालिकेत विजय मिळवला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्टीव्ह वॉ, शेन वॉर्न आणि ग्लेन मॅक्ग्रा यांसारखे महान खेळाडू घडले.

1965 मध्ये त्यांची विज्डन क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड झाली. पुढे त्यांना ICC हॉल ऑफ फेम आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाले. बॉब सिम्पसन यांना सदैव त्या खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून स्मरण केले जाईल, ज्यांनी संघाला विखुरण्यापासून वाचवून विजयाच्या मार्गावर नेले.

आणखी वाचा

Comments are closed.