मनतरंग – लाडोबाचे लाड करतंय कोण?

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

अति लाड झालेली मुलं ही बहुतांश वेळेस ‘पॅम्पर्ड चाईल्ड सिंड्रोम’ग्रस्त असतात. या मानसिक अवस्थेतून जाणाऱया मुलांची सामाजिक आणि नैतिक जडणघडण होत नाही आणि त्यांचा ‘अहं’ हा अधिकाधिक बळावतो. ज्याला समुपदेशन हाच एक मार्ग आहे.

राजस गेल्या महिन्यात जसा तेरा वर्षांचा झाला तशी मानसीताई आणि विजयरावांना (नावे बदलली आहेत) त्याची अधिकच काळजी वाटायला लागली आणि लाजसुद्धा. कारण राजस अजूनही स्वतच्या हाताने जेवत नव्हता. त्याला भरवावे लागत होते. इतकंच नव्हे तर त्याला आंघोळ घालावी लागत होती. जेव्हा तो रात्री झोपायला जायचा तेव्हाही त्याला थोपटावं लागत होतं आणि हे सगळं त्याचे आईवडील म्हणजेच मानसीताई आणि विजयराव दररोज करत होते. सकाळी मानसीताई त्याला जेव्हा उठवत तेव्हा त्यांच्या हातात ब्रश असे. मग राजस ब्रश करत असे. सकाळचं खाणंपिणं हे त्याच्याच मर्जीनुसार असे. कारण त्याच्याच आवडीचा नाश्ता केला गेला नाही, तर तो काही खातच नसे.

त्या दिवशी राजसने शाळा चुकवली. कारण त्याच्या आवडीचं जेवण घरी बनलेलं नव्हतं. झालं! विजयरावांचा पारा चढला आणि त्यांनी त्या दिवशी त्याला झोड झोड झोडला. इतका मार दिला की, शेवटी मानसीताई मध्ये पडल्या तेव्हा त्यांनाही विजयरावांकडून नको नको ते ऐकावं लागलं. “अजून ऐक या माजोरडय़ाचं’’ असं म्हणून ते निघून गेले खरे, पण काही वेळातच राजसकडे येऊन त्यांनी माफी मागितली. “का माफी मागितली?’’ असा प्रश्न करताच त्यांनी मौनाने प्रतिसाद दिला. “विजय तर त्याला नंतर मॅकडीमध्ये घेऊनही गेला.’’ मानसीताई पटकन बोलून गेल्या. “मला भरपूर गिल्ट आलं.’’ विजयराव सांगत होते. राजस खाली मान घालून ऐकत होता खरा, पण मध्येच त्याने मानसीताईंचा मोबाइल घेतला आणि त्याच्यामध्ये व्हिडीओ गेम्स खेळायला लागला.

राजस हा त्यांचा एकुलता एक मुलगा, जो त्यांना महत्प्रयासाने झालेला होता. म्हणजेच त्याचा जन्म हा आयव्हीएफ तंत्रज्ञानाने झालेला होता. त्यामुळे दोघांचंही त्याच्यावर भरपूर जीव होता. राजसचं अक्षरश त्याच्या नावाप्रमाणे पालनपोषण झालं होतं. त्यांच्या घराण्यातही तो एकटाच मुलगा असल्याने आजीöआजोबांनी तर त्याचे भरपूर लाड केले होते आणि करतही होते.

“आम्हाला आता आमच्यासाठीच समुपदेशन हवंय तुमच्याकडून.’’ मानसीताई म्हणाल्या. “आता राजसबरोबरची इतर मुलं जेव्हा आम्ही पाहतोय तेव्हा आम्हालाच आमची लाज वाटते. काय आणि कुठे चुकलं तेच आम्हाला कळत नाही.’’ मानसीताई समुपदेशनाला येण्याचा उद्देश सांगत असतानाच राजस पटकन म्हणाला, “तुम्हाला मी सांगितलं नव्हतं की, मला झोपवा किंवा भरवा. तुम्ही दोघंच करत आलायत आणि मला ते आवडतं.’’ मानसीताई आणि विजयराव अविश्वासाने एकमेकांकडे बघत बसले. अलीकडे राजस फक्त त्या दोघांनाच नव्हे, तर त्याच्या आजी-आजोबांनाही गृहीत धरू लागला होता आणि हक्कही गाजवू लागला होता.

राजस जसा वागत होता आणि जसा घरच्यांना गृहीत धरत होता, ते सगळं ‘पॅम्पर्ड चाईल्ड सिंड्रोम’ या त्याच्या अवस्थेचं लक्षण होतं आणि ही त्याची अवस्था त्याच्या पालकांमुळेच आलेली होती.

‘पॅम्पर्ड चाईल्ड सिंड्रोम’ या अवस्थेच्या नावाप्रमाणेच मुलांचे वागणे (बेताल), बोलणे (अपमानकारक) हे अति लाडाचे असते. पालकांच्या अति लक्ष देण्याने, मुलांचे सगळेच मूड्स नको तेवढे सांभाळल्याने आणि त्यांना गरजेपेक्षा अधिक गोष्टी उपलब्ध करून दिल्याने मुलांची अशी अवस्था होऊ शकते. अशी अति लाडावलेली मुलं मग स्वतला कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती समजू लागतात आणि इतरांना तुच्छ समजू लागतात. अशा अवस्थेत त्यांना सांभाळणे हे पालकांना कठीण होऊन जाते. कारण पालकही तेव्हा द्विधा मनःस्थितीतून जात असतात. विशेषत आयांना याची झळ जास्त पोहोचते. कारण मुलांच्या सर्वांगीण संगोपनाची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर आलेली असते. अशा कुटुंबांमध्ये काही वेळा असंही घडतं की, मुलांना कठोरपणे वागवणारी एक व्यक्ती असेल तर दुसऱया व्यक्ती त्यांना पाठीशी घालतात. त्यामुळे त्यांची सामाजिक आणि नैतिक जडणघडण होत नाही. तसंच त्यांचा ‘अहं’ हा अधिकाधिक बळावतो.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी मुलं ही आत्मकेंद्रित बनतात आणि स्वतला वाजवीपेक्षा जास्त महत्व द्यायला लागतात. बऱयाच वेळा स्वतकडे लक्ष वेधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी ही मुलं कुठलेही अयोग्य वर्तन करायलाही मागेपुढे पाहत नाहीत.

अशा वेळी मुलांच्या अशा वर्तनाला जर वेसण घालायचं असेल तर पालकांनी काही गोष्टींचं भान ठेवणं  गरजेचे असते. जसे की, मुलं जर समोरच्या व्यक्तीला गृहीत धरत असतील तर त्यांना अशा वेळी त्यांच्या वयाची जाणीव करून देणं आवश्यक असतं. तसंच समोरची व्यक्ती जर का त्यांच्यापेक्षा वयाने, अधिकाराने किंवा नात्याने मोठी असेल तर त्या व्यक्तीचा योग्य तो आदर कसा करावा, याचीही जाणीव करून देणं गरजेचं असतं. या सर्वांबरोबर अत्यावश्यक बाब म्हणजे मुलांना त्यांच्या अधिकार आणि हक्कांबरोबरच त्यांच्या कर्तव्याचंही भान लक्षात आणून देणं, जेणेकरून मुलं कोणालाही गृहीत धरणार नाहीत.

मानसीताई आणि विजयरावांना याच गोष्टींची समाज देण्यात येत होती. त्यांचा राजस हा हळवा कोपरा होता. कारण ते लग्नानंतर बरीच वर्षे अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करत होते. तशातच राजस हा लहानपणी खूप वेळा आजारी पडायचा. त्यामुळे ते त्याच्या बाबतीत अधिकच हळवे झाले. त्यामुळे त्याला जपण्याच्या नादात कधी त्यांच्याकडून त्याचे अति लाड केले गेले हे त्यांचं त्यांनाच समजलं नाही.

‘देर आये दुरुस्त आये’ या न्यायाने त्यांनी स्वतच्या वागण्यामध्ये बऱयाच सुधारणा केल्या. राजसलाही त्याच्या वर्तनातील त्रुटी दाखवण्यात आल्या आणि त्याचे वाईट परिणाम त्याच्या पालकांवर आणि आजी-आजोबांवर कसे झाले याचीही जाणीव करून देण्यात आली. राजस तसा मूळचा समजूतदार असल्याने त्यानेही स्वतमध्ये बदल घडवून आणायला सुरुवात केली.

या सर्वांचे हळूहळू एकत्रित परिणाम दिसून येत होते. राजस आता स्वतंत्रपणे स्वतची कामं स्वत करत होता. तसंच आजी-आजोबांवरही लक्ष देत होता. घरातल्या छोटय़ा कामांची जबाबदारी त्याने स्वतहून घेतली होती. त्यामुळे विजयराव आणि मानसीताईंनीही सुटकेचा निश्वास सोडला.

[email protected]

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)

Comments are closed.