युक्रेनचे दोन प्रांत ताब्यात द्या, युद्ध थांबवतो! अलास्का बैठकीत पुतीन यांची अट

युक्रेन विरुद्धचे युद्ध थांबवण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर अट ठेवली आहे. डोनेत्स्क व लुहान्स्क हे प्रांत रशियाच्या ताब्यात द्या, युद्ध थांबवतो, असे पुतीन म्हटले आहे. या मागण्यांवरून मागे हटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘फायनान्शियल टाइम्स’ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. दोन प्रांत देण्याची मागणी मान्य झाल्यास रशिया खेरसन आणि झापोरिझिया प्रदेशांतील आगेकूच थांबवेल आणि पुढील हल्ले करणार नाही, असे पुतीन यांनी म्हटले आहे.  युक्रेनला नाटोचे सदस्यत्व न देता (नॉन नाटो कलम 5 अंतर्गत) सुरक्षेची हमी देण्यावरही या बैठकीत चर्चा झाली. यास पुतीन यांनी तत्वतः मान्यता दिल्याचे समजते.

अलास्का शिखर परिषदेतील चर्चा निष्फळ ठरल्यामुळे आता झेलेन्स्की, पुतीन आणि ट्रम्प यांच्यात त्रिपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे. झेलेन्स्की हे सोमवारी अमेरिकेला भेट देणार असल्याने पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

झेलेन्स्की यांचा स्पष्ट नकार

पुतीन यांची ही अट डोनाल्ड ट्रम्प यांनी  युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना कळवली, मात्र त्यांनी ही मागणी तत्काळ फेटाळून लावली. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, कोणताही भूभाग रशियाला देण्यास झेलेन्स्की यांनी स्पष्ट नकार दिला आहे. शांततेसाठी त्रिपक्षीय बैठक न झाल्यास रशियावरील निर्बंध आणखी कठोर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शांतता करार करताना  युक्रेनच्या सहभागाशिवाय कोणताही निर्णय घेता येणार नाही,’ असेही झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.