नोकरी निर्मात्यांसाठी विनामूल्य भूखंड
वृत्तसंस्था / पाटणा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यात रोजगारनिर्मिती वाढावी, यासाठी एका अभिनव योजनेची घोषणा केली आहे. मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करणाऱ्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगांसाठी विनामूल्य भूखंड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. बिहारमध्ये येत्या पाच वर्षांमध्ये एक कोटी नवे रोजगार निर्माण करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिलेले आहे. या आश्वासनाची पूर्ती करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून ही योजना घोषित करण्यात आली आहे.
2020 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी नितीश कुमार यांनी बिहारमध्ये 50 लाख युवकांना सरकारी नोकरी उपलब्ध करुन दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण केले असल्याचे प्रतिपादन त्यांनी ‘एक्स’ वर प्रसारित केलेल्या संदेशात केले असून त्यानंतर या नव्या योजनेची घोषणा केली.
उद्योग स्थापणाऱ्यांना पॅकेज
बिहारमध्ये उद्योग स्थापन करणाऱ्या उद्योजकांना विशेष आर्थिक पॅकेज दिले जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. भांडवल अनुदान, व्याज अनुदान या योजनांसह आता विनामूल्य भूमीचाही लाभ उद्योजकांना होणार आहे. ही भूमी अर्थातच केवळ उद्योगाची स्थापना करण्यासाठीच असेल. या उद्देशाखेरीज अन्य कारणांसाठी त्या भूमीचा उपयोग करता येणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे.
Comments are closed.