अंतराळवीर शुबंशू शुक्ला आज एका वर्षा नंतर घरी परतला
अमेरिकेतून रवाना : भव्य स्वागताची सज्जता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, लखनौ
‘अॅक्सिओम मिशन 4’द्वारे पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचलेला भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला एक वर्षानंतर आपल्या मायदेशी परतत आहे. लखनौच्या त्रिवेणी नगर येथील रहिवासी अंतराळवीर आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला 17 ऑगस्ट रोजी भारतात दाखल होईल. त्याने अमेरिकेतून भारतात परतण्यासाठी विमान प्रवास सुरू केला आहे. त्याने स्वत:च आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर ही माहिती देताना एका फोटोही शेअर केला आहे.
शुभांशू शुक्ला याचे रविवारी सकाळी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. याप्रसंगी त्यांचे भव्य स्वागत होणार असून त्याची सज्जता करण्यात आली आहे. तसेच तो उत्तर प्रदेशमधील आपल्या गावी पोहोचल्यानंतर तेथे भव्य रोड शो आयोजित करण्यात आला आहे. लखनौमध्ये त्याच्या घरी अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यासाठी कुटुंबियांची जोरदार तयारी सुरू आहे. भारतात परतल्यानंतर शुभांशू पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटणार आहे. तसेच बेंगळूरमध्ये 23 ऑगस्ट रोजी होणाऱ्या इस्रोच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ दिनाच्या समारंभातही तो सहभागी होईल.
इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट
भारताच्या दिशेने प्रवास सुरू केल्यानंतर शुभांशूने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘भारतात परतण्यासाठी विमानात बसताच माझ्या मनात अनेक प्रकारच्या भावना निर्माण होत आहेत. या मोहिमेदरम्यान गेल्या वर्षभर माझे मित्र आणि कुटुंबातील जे अद्भुत लोक होते त्यांना मागे सोडून जाण्याचे मला दु:ख आहे. यशस्वी मोहिमेनंतर आता पहिल्यांदाच माझे सर्व मित्र, कुटुंब आणि देशातील लोकांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. मोहिमेदरम्यान आणि नंतर सर्वांकडून अविश्वसनीय प्रेम आणि पाठिंबा मिळाल्यानंतर, मी तुम्हा सर्वांसोबत माझा अनुभव शेअर करण्यासाठी भारतात परत येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे’, अशी पोस्ट शुभांशूने व्हायरल केली आहे.
अंतराळ क्षेत्रात भारताची मोठी कामगिरी
25 जून रोजी फ्लोरिडाहून निघालेल्या अॅक्सिओम-4 खासगी अंतराळ मोहिमेत शुक्ला सहभागी झाला होता. 26 जून रोजी ते आयएसएसशी जोडले गेले. 18 दिवसांच्या या मोहिमेदरम्यान त्यांनी अमेरिकेच्या पेगी व्हिटसन, पोलंडच्या स्लावोज उजनांस्की-विस्निव्हस्की आणि हंगेरीच्या टिबोर कापू यांच्यासोबत 60 हून अधिक प्रयोग आणि 20 जनसंपर्क सत्रे केली. अॅक्सिओम-4 मोहिमेतील सहकाऱ्यांना घेऊन जाणारे ड्रॅगन अंतराळयान 15 जुलै रोजी सॅन दिएगो किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात उतरल्यानंतर मोहीम यशस्वी झाली. भारताच्या गगनयानसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
Comments are closed.