माहिती अधिकाऱ्याच्या पत्नीची अमरावतीच्या पत्रकार महिलेला धमकी

स्वातंत्र्यदिनी जालन्यात पोलीस उपअधीक्षकाने उपोषणकर्त्याच्या कमरेत लाथ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे, तर दुसरीकडे अमरावती येथे जिल्हा माहिती अधिकाऱ्याच्या पत्नीने एका पत्रकार महिलेला उपोषण स्थळी जाऊन धमकी दिल्याची घटना स्वातंत्र्यदिनीच घडली आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या अरेरावीमुळे संताप व्यक्त होत आहे.
अमरावतीत गेले काही दिवस माहिती अधिकाऱ्याचे ‘इंडिसेंट प्रपोजल’ प्रकरण चांगलेच तापले आहे. स्थानिक पत्रकार वंदना तळखंडे यांनी संबंधित माहिती अधिकारी गजानन कोटुरवार यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी 14 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कोटुरवार यांच्या पत्नीने उपोषण बंद करून तक्रार मागे घे. असे न केल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पत्रकार वंदना तळखंडे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात दिली आहे.
माझ्या नवऱ्याची पोच मंत्रालयापर्यंत आहे. त्याचे कोणीही काही बिघडू शकत नाही, अशी धमकी कोटुरवार यांच्या पत्नीने दिली आहे. या प्रकरणात तक्रार दाखल करून ताबडतोब कारवाई करावी. माझ्या जिवाला धोका आहे असे मला वाटते. तरी माझ्या जिवाचे किंवा माझ्या कुटुंबाचे काही बरे-वाईट झाल्यास कोटुरवार यांना जबाबदार धरण्यात यावे, असे तळखंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
Comments are closed.