दिवाळीपूर्वी जीएसटी कपातची 'चांगली बातमी'

अनेक वस्तू होणार स्वस्त : करप्रणालीत बदल करण्याची पंतप्रधानांची स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून घोषणा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतर लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी पाकिस्तान आणि अमेरिकेला इशारा देतानाच जीएसटी प्रणालीत बदल करण्याची घोषणा करत त्यांनी देशवासियांना सुखद धक्का दिला. येत्या दिवाळीत तुम्हाला एक मोठी भेट मिळणार आहे. आम्ही सलग 8 वर्षे जीएसटी कमी करण्यासाठी काम केले आहे. आम्ही पुढच्या पिढीच्या जीएसटीवर काम करत आहोत आणि या दिवाळीत आपण खरेदी केलेल्या आणि दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तू खूप स्वस्त होतील. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी घोषणा देखील नरेंद्र मोदींनी केली.

स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लाल किल्ल्यावरून बोलताना येथून सलग बाराव्यांदा देशाला संबोधित करताना उर अभिमानाने भरून आल्याचे सांगितले. तसेच ऑपरेशन सिंदूरबाबतही नरेंद्र मोदींनी भाष्य केले. पहलगाममध्ये सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांचा संहार करण्यात आला. पहलगाममध्ये पर्यटकांना धर्म विचारून मारले गेले. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर देशाच्या संतापाची अभिव्यक्ती होती. सेनादलाला आम्ही पूर्ण मुभा दिली होती. लक्ष्य आणि कारवाई त्यांनीच निश्चित केली, असे नरेंद्र मोदी म्हणाले. पाकिस्तान उद्ध्वस्त झाल्यासंबंधी रोज नवनवी माहिती येतेय असे सांगतानाच पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाल्याचेही पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून पुन्हा एकदा सांगितले.  आज आपल्याला लाल किल्ला तटबंदीवरून ऑपरेशन सिंदूरच्या शूर सैनिकांना सलाम करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या शूर सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा दिली आहे. अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही, असा इशारा देखील नरेंद्र मोदींनी दिला. सिंधू जलवाटप करार अन्यायकारक होता, हे देशाला समजलंय, असेही ते पुढे म्हणाले.

‘जीएसटी 2.0’ लागू करण्याची तयारी

वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर आठ वर्षांनी, केंद्र सरकार जीएसटी 2.0 लागू करण्याची तयारी करत आहे. त्याचा उद्देश सामान्य लोक आणि व्यावसायिकांचे जीवन सोपे करणे आणि कराचा भार कमी करणे आहे. सरकार जीएसटीच्या रचनेत मोठा बदल करणार आहे. या अंतर्गत, बहुतेक वापरल्या जाण्राया वस्तूंवर 5 टक्के आणि उर्वरित वस्तूंवर 18 टक्के कर लादण्याचा प्रस्ताव आहे. सध्या, 12 टक्के आणि 28 टक्के हा कर स्लॅब रद्द करण्याची योजना आहे. तसेच, मार्चमध्ये भरपाई उपकर देखील बंद केला जाईल. या नव्या प्रणालीमुळे अन्नपदार्थ, औषधे, वैद्यकीय उपकरणे, स्टेशनरी, शैक्षणिक वस्तू आणि केसांचे तेल आणि टूथब्रश यासारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवर कोणताही कर आकारला जाणार नाही किंवा 5 टक्के कर आकारला जाईल. यामुळे या वस्तू खूपच स्वस्त होतील. जॅम, फ्रूट जेली, फळांचा रस, पॅकेज्ड नारळपाणी इत्यादी वस्तूंवरी  करदेखील कमी होऊ शकतात. त्याचवेळी, मध्यमवर्गीय लोक वापरत असलेल्या एसी, टीव्ही आणि फ्रिज अशा वस्तू 18 टक्के स्लॅबमध्ये ठेवल्या जातील. तथापि, सरकार ऑटोमोबाईल आणि सिमेंटवर कसा कर लावेल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. सध्या त्यांच्यावर 28 टक्के कर आकारला जात आहे. नजिकच्या काळात या नव्या स्लॅबबाबतची अधिकृत घोषणा होऊ शकेल.

‘सुदर्शन चक्र’ मिशनची घोषणा

नरेंद्र मोदींनी देशाच्या सुरक्षेबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सुदर्शन चक्र मिशनची घोषणा केली आहे. ही एक शक्तिशाली शस्त्र प्रणाली असून ती केवळ शत्रूच्या हल्ल्याला निष्प्रभ करेलच असे नाही तर अनेक पटींनी प्रत्युत्तर देखील देईल, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.

तरुणांसाठी मोठी घोषणा

पंतप्रधान मोदींनी तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे. आज, 15 ऑगस्ट रोजी, आम्ही पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत देशातील तरुणांसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या योजना राबवत आहोत. खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी आणणाऱ्या कंपनीलाही प्रोत्साहन मिळेल. याचा फायदा 3.5 कोटी तरुणांना होईल, असे पंतप्रधान म्हणाले.

तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार

भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याबाबतही पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून भाष्य करत देशवासियांना स्पष्ट संदेश दिला. आज महागाई नियंत्रणात आहे आणि आपला साठा मजबूत आहे, सूक्ष्म अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि जागतिक रेटिंग एजन्सी भारताच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करत आहेत. आम्ही सुधारणा योग्यरित्या अंमलात आणण्यासाठी एक टास्क फोर्स तयार केला आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्यासाठी ही शक्ती स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘मेड इन इंडिया’वर भर देणार

आज जगभर तंत्रज्ञानाबद्दल चर्चा आणि प्रयत्न होत आहेत. चार-पाच दशकांपूर्वी आपल्या देशात सेमीकंडक्टरबद्दल चर्चा होत होती, पण कोणीही लक्ष दिले नाही. आता आम्ही त्यावर काम केल्यामुळे 6 युनिट्सची निर्मिती करण्यात आली आहे. चालू वर्षाच्या अखेरीस आम्ही मेड इन इंडिया चिप्स आणू, अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली. आज विकसित भारताचा पाया देखील स्वावलंबन आहे. स्वावलंबन कमी झाले तर ताकदही कमी होते. स्वत:च्या ताकदीचे रक्षण आणि देखभाल करण्यासाठी स्वावलंबन खूप महत्वाचे आहे, असेही ते पुढे म्हणाले.

व्यापाऱ्यांना आवाहन

जर आपण देशाच्या मातीचा सुगंध असलेल्या सर्व वस्तू खरेदी केल्या आणि भारताला समृद्ध करण्यासाठी देशाच्या वस्तू देखील खरेदी केल्या, तर तुम्हाला दिसेल की देश पुढे जाईल. देशातील व्यापाऱ्यांनीही ‘येथे स्वदेशी वस्तू विकल्या जातात’, असे फलक लावावेत. आपण स्वदेशीचा वापर सक्ती म्हणून नाही तर ताकदीसाठी करू आणि गरज पडली तर आपण दुसऱ्याला भाग पाडण्यासाठीही त्याचा वापर करू, असे पंतप्रधान म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक

भारत देश लाखो लोकांनी बनवला आहे आणि देशातील प्रत्येक व्यक्ती देश बनवते. 100 वर्षांपूर्वी, एक संघटना जन्माला आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जन्माला आला ज्याने व्यक्ती निर्माण करून राष्ट्र उभारणीसाठी सतत काम केले आहे. स्वत:ला देशासाठी समर्पित केले आहे. एकप्रकारे ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे जी देशासाठी सतत काम करत आहे, मी तिला सलाम करतो, अशा शब्दात पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले.

राजकीय पक्षांना आवाहन

आम्ही जे काही करत आहोत ते आम्ही देशासाठी करत आहोत, कोणाचेही नुकसान करण्यासाठी नाही. आपल्या देशातील राजकीय पक्षांनी या सुधारणेत आमच्यासोबत सामील व्हावे, असे आवाहन देखील नरेंद्र मोदींनी केले. सध्या संसद अधिवेशनामध्ये सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी विरोधी पक्षांना हे आवाहन केल्याचे दिसून येते. आपल्या देशातील शेतकरी, महिला आणि देशवासियांना कोणत्याही योजनेचा जास्तीत जास्त फायदा मिळावा यासाठी आम्ही सतत काम करत आहोत, असेही नरेंद्र मोदींनी सांगितले.

 

Comments are closed.