निवडणूक आयोग प्रतिसाद देण्यासाठी सज्ज आहे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाला लाभ होईल अशा प्रकारे केंद्रीय निवडणूक आयोग मतांची चोरी करत आहे, असा आरोप विरोधकांनी, विशेषत: काँग्रेसने केला आहे. या आरोपांचा समाचार घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आज रविवारी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग विरोधकांच्या आरोपांच्या संदर्भात स्थिती स्पष्ट करणार आहे.
सर्वसाधारणपणे केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुकांची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करत असतो. तथापि, यावेळी विरोधकांच्या आरोपांचे निराकरण करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याने ही महत्वाची घडामोड मानण्यात येत आहे. आयोगाने अधिकृतरित्या रविवारच्या पत्रकार परिषदेचा विषय स्पष्ट केलेला नाही. तथापि, सध्याच्या परिस्थितीत ही पत्रकार परिषद अन्य कोणत्या विषयावर असण्याची शक्यता नाही. त्यामुळे या पत्रकार परिषदेसंबंधी मोठी उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या महिनाभरात आयोगावर बरेच आरोप केले आहेत. पण आयोगाने ते स्पष्टपणे फेटाळले असून गांधी यांच्याकडे प्रतिज्ञापत्रावर पुराव्यांसहित आरोप करण्याची मागणी अनेक वेळेला केली आहे.
Comments are closed.