ज्योती मल्होत्राविरूद्ध चार्जशीटने दाखल केले
युट्यूबर पाकिस्तानची हस्तक असल्याचा आरोप
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात यशस्वी केलेले ‘सिंदूर अभियान’ या काळात पाकिस्तानची प्रशंसा करणारे संदेश आपल्या युट्यूब वाहिनीवरुन प्रसिद्ध करणाऱ्या ज्योती मल्होत्रा हिच्यावर विशेष अन्वेषण दलाने आरोपपत्र सादर केले आहे. 2,500 पृष्ठांच्या या आरोपपत्रात तिने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप प्रमुख आहे. पाकिस्तानच्या हेरविभागाशी तिचे संबंध होते आणि तिने भारताची हानी करण्याचा प्रयत्न केला, असेही नमूद केले गेले आहे.
तिच्याविरोधात भक्कम पुरावे असल्याचे प्रतिपादन अन्वेषण दलाने केले आहे. तिच्या मोबाईलमधून आणि लॅपटॉमधून मिळालेल्या माहितीवरुन तिचे पाकिस्तानशी गुप्त संबंध असल्याचे स्पष्ट होत आहे. पाकिस्तानच्या गुप्तहेरांशी असलेले तिचे ‘नजीक’चे संबंधही या पुराव्यांमधून उघड झाले आहेत. ज्योती मल्होत्रा सातत्याने पाकिस्तानचा हस्तक दानिश अली याच्याशी संपर्कात होती. पाकिस्ताची गुप्तहेर संस्था आयएसआयचे हस्तक शकीर, हसन अली आणि नासीर धिल्लाँ यांना भारतातील घटनांची माहिती पुरवत होती, असे अनेक आरोप आहेत.
अनेकदा विदेश प्रवास
गेल्या दोन वर्षांमध्ये ज्योती मल्होत्रा हिने अनेकदा पाकिस्तानात आणि इतर देशांमध्ये संशयास्पद प्रवास केला. तिने पाकिस्तानच्या प्रवासात अनेकदा आयएसआय हस्तकांची भेट घेतली. तिने भारताची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरविण्यासाठी आयएसआयकडून आर्थिक मोबदलाही घेतला, हे तिच्या बँक खात्यांवरुन स्पष्ट होत आहे, असे एसआयटीने आरोपपत्रात स्पष्ट केले आहे.
16 मे या दिवशी अटक
ज्योती मल्होत्रा हिला हरियाणात 16 मे 2025 या दिवशी अटक करण्यात आली होती. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. तिने तिच्यावरील आरोप नाकारले असले तरी एसआयटी पुराव्यांसंबंधी ठाम आहे. तिचा तपास करत असताना हरियाणा पोलिसांनी तिच्याशी संबंधित असणाऱ्या अनेक युट्यूबर्सचा आणि सोशल मिडियावर सक्रीय असणाऱ्या लोकांचा तपास केला होता.
Comments are closed.