BCCIच्या बैठकीपूर्वी बुमराहची एंट्री कन्फर्म; आशिया कप 2025 साठी टीम इंडिया स्क्वॉडवर सर्वांचे लक्ष
अजीत अगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती 19 ऑगस्ट रोजी आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यासाठी बैठक घेणार आहे. या बैठकीत अनेक खेळाडूंच्या नशिबाचा निर्णय होणार असून अखेरीस फक्त 15 प्लेयर्सना टूर्नामेंटमध्ये संधी दिली जाणार आहे. हेच 15 खेळाडू आगामी T20 World Cup 2026 साठी देखील प्रमुख दावेदार मानले जातील.
या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी भारताचा नंबर-1 वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने बीसीसीआय आणि निवडकर्त्यांना आपल्या उपलब्धतेबद्दल माहिती दिली आहे. बुमराह शेवटचा इंग्लंड दौऱ्यावर अॅक्शनमध्ये दिसला होता, जिथे वर्कलोडमुळे त्याने फक्त 3 टेस्ट सामने खेळले.
बुमराहने आधीच निवडकर्त्यांना आपली इच्छा कळवली असून तो आशिया कप खेळण्यासाठी तयार आहे. त्यामुळे त्याचा संघात समावेश जवळजवळ नक्की मानला जात आहे. “बुमराहने निवडकर्त्यांना सूचित केले आहे की तो आशिया कप निवडीसाठी उपलब्ध असेल. निवड समिती पुढील आठवड्यात बैठक घेऊन यावर चर्चा करेल.”
जसप्रीत बुमराहने शेवटचा T20I जून 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. तो सामना म्हणजे T20 World Cup 2024 Final होता, ज्यात भारताने रोमांचक लढतीत आफ्रिकन संघाचा पराभव केला होता. त्यानंतर बुमराहने एकही T20I खेळलेला नाही आणि आता तो थेट आशिया कपमध्ये परतणार आहे.
भारत आपला पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमिरातविरुद्ध खेळेल. त्यानंतर 14 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना होईल. या सामन्याबद्दल अंतिम निर्णय वेळ आल्यावरच होईल. अखेरीस भारत आपला शेवटचा गट फेरीतील सामना 19 सप्टेंबर रोजी ओमानविरुद्ध खेळणार आहे.
या स्पर्धेत ग्रुप A मध्ये भारत, यूएई, पाकिस्तान आणि ओमान आहेत, तर ग्रुप B मध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे.
Comments are closed.