प्रेरणा – पारंपरिक खेळातून संस्कृतीचे जतन

>> पराग पोतदार

सध्याच्या डिजिटल युगात आपले भारतीय पारंपरिक खेळ मुले विसरत चालली आहेत. काही खेळ तर काळाच्या ओघात लुप्त झाले आहे की काय असेच वाटत आहे. असे पारंपरिक हे खेळ जतन व्हावेत आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचावेत यासाठी बंगळुरूमधील तनुश्री एस. एन. आणि शशिशेखर एस. हे दाम्पत्य पारंपरिक खेळ पुनरुज्जीवित करण्याचे काम करीत आहे.

मोबाईलच्या जगाने आपल्याला खेळांपासून दूर नेले आहे. मैदानी खेळ फारसे खेळले जात नाहीत. सोबत बालपणी आवर्जून खेळले जाणारे खेळ आता इतिहासजमा होतात की काय अशी स्थिती आहे. मात्र अशी नकारात्मक स्थिती असतानाही पारंपfिप खेळांचे महत्त्व पुढच्या पिढीला समजावे यासाठी प्रयत्न करणारे हात आहेत याचे समाधान वाटते.  सध्याच्या डिजिटल युगात आपले भारतीय पारंपरिक खेळ विस्मरणात गेले असले तरी त्यांना पुन्हा वहिवाटेत आणण्याचे महत्त्वाचे काम बंगळुरूमधील तनुश्री एस. एन. आणि शशिशेखर एस. हे दाम्पत्य करीत आहे. आपले पारंपरिक खेळ जतन व्हावेत आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचावेत यासाठी त्यांनी ‘रोल द डाईस’ या नावाने कंपनी स्थापन केली असून याद्वारे हे खेळ पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न हे दाम्पत्य करीत आहे. त्यांनी पगडे, चौकाबारा, गंजिफा यांसारखे खेळ तयार केले असून त्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

तनुश्री व शशिशेखर हे आयटी इंजिनीअर असलेले दाम्पत्य. 2013 साली आई झाल्यानंतर तनुश्रीच्या लक्षात आले की, आजच्या मुलांमध्ये भारतीय पारंपरिक खेळांची ओढ संपत चालली आहे. सध्या मुले मोबाईल गेम्स, टीव्ही, व्हिडीओ गेम्स अशा गोष्टींमध्ये अडकले आहेत, परंतु आपल्या संस्कृतीतील पारंपरिक खेळ मात्र लुप्त होत आहेत. जे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विकास करणारे आहेत. त्यामुळेच आपले हे खेळ जतन होणे गरजेचे आहे. हाच विचार करून तिने स्वतच पगडे, चौकाबारा, गंजिफा यांसारखे हे खेळ तयार केले.

कापडाने शिवून तयार केलेले हे खेळ सुरुवातीला फक्त घरातल्या मुलांसाठी बनवले जात होते, पण हळूहळू लोकांना ते आवडू लागले आणि ऑर्डर्स येऊ लागल्या. खेळांना मिळणारा प्रतिसाद पाहून तनुश्री आणि शशिशेखरन दोघांनीही आपली आयटीमधील नोकरी सोडून पूर्णवेळ याच कामाला वाहून घेण्याचे ठरवले व त्यांनी ‘रोल द डाईस’ नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीद्वारे त्यांनी केवळ जुन्या खेळांचे पुनरुज्जीवन केले नाही, तर प्रत्येक खेळाची गोष्ट, इतिहास, नियम शोधून काढले. मंदिरे, गावातील वडीलधारी मंडळी यांच्याकडून माहिती गोळा केली. कार्डबोर्डवरून ते टिन बॉक्स, लाकडी प्यादे, शंख-शिंपले वापरून त्यांनी खेळ अधिक आकर्षक आणि टिकाऊ बनवले. प्रत्येक खेळ हाताने बनवलेला, पर्यावरणपूरक आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारा. आज त्यांच्या कलेक्शनमध्ये 17 हून अधिक पारंपरिक खेळ आहेत. त्यामध्ये पगडे, चौकाबारा, गंजिफा, रमायण पझल, पतंग बनवण्याचे गेम, मोदक रेस अशा विविध खेळांचा समावेश आहे.

2019 मध्ये त्यांनी ऑनलाइन स्टोअर सुरू केले आणि नंतर अॅमेझॉनवरदेखील प्रॉडक्ट्स लिस्ट केले. 2022 मध्ये मैसूरमध्ये अनुभव केंद्र सुरू केले, जिथे लोक येऊन खेळ खेळू शकतात. त्यांनी बनवलेले खेळ बंगळुरू, पुणे आदी ठिकाणी खेळांच्या दुकानात उपलब्ध आहेत. यातून साधारणतः महिन्याला दोन लाखांचे उत्पन्न त्यांना मिळते आहे. आज हजारो मुले आणि पालक त्यांनी बनवलेले पारंपरिक खेळ शिकत आहेत. हा उपक्रम केवळ व्यवसाय नाही, तर आपली भारतीय संस्कृती जपण्याचे मोठे काम असल्याचेही दोघे सांगतात.

तनुश्री व शशिशेखर यांच्या या कामाची दखल घेऊन 2023 साली त्यांना ‘स्टार्टअप कर्नाटका इलेव्हेट’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांनी तयार केलेल्या या पारंपरिक खेळांमुळे स्मरणशक्ती वाढते. त्याचबरोबर पारंपरिक खेळांचा इतिहास आणि संस्कृती यांचा मेळ घालतात. हेच निकष ठेवून त्यांनी खेळण्यांमध्ये बदल करीत त्यात प्रयोगशीलता राखण्यात सातत्य ठेवले आहे.

झेड [email protected]

Comments are closed.