विक्रोळीत दरड कोसळली, एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू

मुंबई शहरासह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱया मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. विक्रोळी पार्कसाईट वर्षा नगर येथील जनकल्याण सोसायटीत राहणाऱ्या मिश्रा कुटुंबाच्या घरावर शुक्रवारी मध्यरात्री दरड कोसळली. या दुर्दैवी घटनेत साखरझोपेत असलेल्या मिश्रा कुटुंबातील शालू मिश्रा (19) आणि सुरेश मिश्रा (50) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आरती मिश्रा (45) आणि ऋतुराज मिश्रा (20) या जखमींवर नजीकच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे पार्कसाईट परिसरात शोककळा पसरली आहे.
पार्कसाईट या परिसरातील डोंगरावर मोठी झोपडपट्टी आहे. अनेक भागांमध्ये संरक्षक भिंत बांधूनही प्रत्येक पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका असतो. वर्षा नगर या डोंगराळ वस्तीत वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शिवसेना मदतीला धावली
या दुर्घटनेची माहिती मिळताच शिवसैनिक मदतीसाठी धावले. स्थानिकांच्या मदतीने शिवसैनिक बचावकार्यात सहभागी झाले. तसेच घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. विभागप्रमुख सुरेश पाटील, उपविभाग प्रमुख सुनील मोरे, माजी नगरसेविका स्नेहल मोरे, शाखाप्रमुख प्रकाश भेकरे, शिव आरोग्य सेना मुंबई जिल्हा सहसमन्वयक प्रकाश वाणी, सचिन भांगे, चंद्रकांत हळदणकर आदी यावेळी उपस्थित होते.
Comments are closed.