Health Tips: अंडी की पनीर? कशात आहे जास्त प्रोटीन
जिममध्ये तासन्तास घाम गाळूनही हवा तसा बदल दिसत नाही अशी तक्रार अनेक फिटनेसप्रेमींना असते. वजन कमी होणं थांबणं, स्नायूंची वाढ न होणं किंवा सतत थकवा जाणवणं यामागे एक मोठं कारण म्हणजे शरीरात प्रोटीनची कमतरता. प्रोटीन हे फक्त बॉडीबिल्डिंग करणाऱ्यांसाठी नसून प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. यामुळे स्नायू आणि हाडं मजबूत राहतात, तसेच शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते.
मात्र, प्रश्न असा पडतो की प्रोटीनसाठी उत्तम स्रोत कोणता नॉनव्हेजमधील उकडलेली अंडी की शाकाहारींसाठी लोकप्रिय असलेलं पनीर? चला, यामध्ये कोणतं जास्त फायदेशीर आहे ते पाहूया.
अंडं लहानसं पण ‘सुपरफूड’
अंड्याला ‘सुपरफूड’ म्हटलं जातं आणि ते खऱ्या अर्थाने योग्यच आहे. एका उकडलेल्या अंड्यात सुमारे ६ ग्रॅम उच्च दर्जाचं प्रोटीन असतं. त्यात सर्व आवश्यक अमिनो अॅसिड्स असतात, जे स्नायूंची वाढ आणि दुरुस्तीसाठी अत्यावश्यक आहेत. अंड्याचं प्रोटीन सहज पचतं आणि वर्कआउटपूर्वी किंवा नंतर त्वरित ऊर्जा देतं. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी अंडं उत्तम पर्याय ठरतो.
पनीर शाकाहारींसाठी प्रोटीनचा राजा
पनीरमध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि हेल्दी फॅट्स यांचा उत्तम संगम असतो. 100 ग्रॅम पनीरमध्ये तब्बल 18 ते 22 ग्रॅम प्रोटीन असतं, जे अंड्याच्या तुलनेत जवळपास तीनपट आहे. पनीरमधील कॅल्शियम हाडं आणि दात मजबूत ठेवतो, तर त्यातील हेल्दी फॅट्स पोट जास्त वेळ भरलेलं ठेवतात. त्यामुळे ओव्हरईटिंग टाळता येतं आणि स्नायूंची वाढ अधिक वेगाने होते.
मग निवड काय करायची?
जर तुमचं उद्दिष्ट वजन कमी करणं असेल, तर अंडी अधिक उपयुक्त आहेत. त्यात कमी कॅलरी असून पचायला सोपी असतात. पण, मसल्स वाढवायचे असतील तर पनीरचं प्रोटीन अधिक परिणामकारक ठरतं. तरीही आहारात दोन्ही पदार्थांचा समावेश केला तर शरीराला ऊर्जा, स्नायूंची वाढ आणि हाडांची ताकद – सर्व मिळून संतुलित फायदा मिळतो.
Comments are closed.