शिर्डीत नियोजन कोलमडले; साईभक्तांकडून संताप

सलग सुट्टय़ांमुळे शिर्डीत साईभक्तांचा महासागर उसळला. दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. गर्दीमुळे प्रशासनाचे सर्व नियोजन कोलमडून पडले आहे. गर्दी, वाहतूककोंडी, अव्यवस्था, स्वच्छतेचा बोजवारा आणि वाहने पार्किंगसाठी भक्तांची होणारी लूट, या सर्व प्रकारांमुळे पवित्र स्थळांचा चेहरा मलीन झाला आहे.

शनिशिंगणापूरपासून शिर्डीपर्यंत रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भक्तांना मंदिर दर्शनासाठी तासन्तास थांबावे लागत असून, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.

शिर्डी परिसरातील खासगी पार्ंकगधारकांनी गर्दीचा गैरफायदा घेत पार्किंग दरात अवाच्या सवा वाढ केली होती. गाडी पार्किंगसाठी नेहमी 50-100 रुपये असणारा दर आता थेट 500 ते 1000 रुपयांपर्यंत नेण्यात आला होता. त्यामुळे भाविकांनी संताप व्यक्त केला.

गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, याबाबतचे सर्व नियोजन फसले आहे. ठिकठिकाणी रस्ते अडलेले, उभ्या गाडय़ांच्या रांगा, कचऱ्याचे ढीग, पिण्याच्या पाण्याची टंचाई होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या.

‘ही तीर्थक्षेत्रे की लूटक्षेत्रे’

अनेक साईभक्तांनी सोशल मीडियावरून थेट प्रशासनाला धारेवर धरले आहे. ‘देवदर्शनासाठी आलो; पण इथे लुटमार आणि त्रास सोडून काही मिळाले नाही, असा संताप अनेकांनी व्यक्त केला आहे. स्थानिक पातळीवर या विरोधात संतप्त चर्चा सुरू असून, ‘ही तीर्थक्षेत्रे की लूटक्षेत्रे?’, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शनिशिंगणापुरात पेड दर्शनासाठी रांगा

तीर्थक्षेत्र शनिशिंगणापुरात शनिमहाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना चौथऱ्याखालून दर्शन घेता येते. चौथऱ्यावर जाऊन शनिमूर्तीला तेलाभिषेक करण्यासाठी प्रत्येकी पाचशे रुपयांची देणगी पावती आकारली जात आहे. पेड दर्शनासाठीसुद्धा भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. हजारो भाविकांनी चौथऱ्यावर जाऊन थेट शनिमूर्तीला तेलाभिषेक करून दर्शन घेतले.

Comments are closed.