Silver Jewellery Hallmark: चांदीची वस्तू खरेदी करताय?; मग हे नवीन नियम वाचाच
सध्या सणावाराचे दिवस सुरू आहेत. अशातच आपण चांदीची भांडी, दागिने घेण्याचा विचार करत असतो. तुम्ही जर सध्या चांदीची वस्तू घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण 1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवर नवीन नियम लागू होणार आहे. ते नियम नेमके काय आहे ते आपण जाणून घेऊया…
सरकारकडून सोन्याप्रमाणे आता चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना बनावट आणि शुद्ध चांदी ओळखण्यात फायदा होईल असे सांगण्यात येत आहे. एका अहवालानुसार, भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ने निर्णय घेतला आहे की आता चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग केले जाईल. असे असले तरी सुरुवातीला हे अनिवार्य नसेल. म्हणजेच सुरुवातीच्या काळात हॉलमार्क केलेले किंवा हॉलमार्क नसलेले दागिने खरेदी करता येऊ शकतील.
चांदीची शुद्धता पातळी
बीआयएसकडून चांदीसाठी ६ शुद्धता पातळी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. जसे की, 900, 800, 835, 925, 970 आणि 990. आता प्रत्येक चांदीच्या दागिन्यांना 6 अंकी युनिक हॉलमार्क आयडी (HUID) दिला जाईल. यावरूनच ग्राहकांना दागिन्यांची गुणवत्ता लक्षात येईल.
हॉलमार्किंग म्हणजे काय?
हॉलमार्किंग म्हणजे धातूच्या शुद्धतेची हमी देणे. सरकारने ठरवलेल्या प्रक्रियेत, सोने किंवा चांदीसारख्या धातूंची बीआयएसच्या मानकांनुसार चाचणी आणि प्रमाणन केले जाते. यामुळे ग्राहकाला सोने किंवा चांदीच्या गुणवत्तेची खात्री करता येते.
ग्राहकांना फायदे
या नियमाचा सर्वात मोठा फायदा ग्राहकांना होईल. आता बीआयएस केअर अॅपवरील “व्हेरिफाय एचयूआयडी” फीचरद्वारे दागिन्यांवर लिहिलेले हॉलमार्क खरे आहे की बनावट हे सहजपणे तपासू शकतील. 2021 मध्ये सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य केले होते.
Comments are closed.