बिहार निवडणूक 'चोरी' होऊ देणार नाही!

राहुल गांधींकडून ‘वोटर अधिकार यात्रे’चा शुभारंभ : बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू

वृत्तसंस्था/ पाटणा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी बिहारच्या सासाराम येथून स्वत:च्या 16 दिवसीय आणि जवळपास 1300 किलोमीटर लांब ‘वोटर अधिकार यात्रे’ची सुरुवात केली आहे. या यात्रेला विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडी’ आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘वन पर्सन, वन वोट’च्या तत्वाच्या रक्षणासाठी मोठे अभियान ठरवत आहे. या यात्रेचा 1 सप्टेंबर रोजी पाटणा येथे एका भव्य सभेसह समारोप होणार आहे. यापूर्वी विरोधी पक्षांच्या आघाडीने सासाराम येथे एका सभेला संबोधित केले. यादरम्यान राहुल गांधी यांनी बिहारच्या निवडणुकीची चोरी करू देणार नसल्याचे वक्तव्य केले आहे.

या सभेला राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव, नेते तेजस्वी यादव, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे समवेत बिहारमधील विरोधी पक्षांचे नेते सामील झाले. मताचा अर्थ राज्य म्हणजे छोटे राज्य असतो असे लालूप्रसाद नेहमी म्हणत असतात, परंतु आता भाजप आणि निवडणूक आयोगादरम्यान आघाडी होत ते निवडणूक चोरू पाहत असल्याचा दावा तेजस्वी यादव यांनी केला आहे.

बिहारमध्ये एसआयआर करवून खऱ्या मतदारांची नावे यादीतून हटवत नवे मतदार जोडून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न भाजप करेल, परंतु बिहारची जनता मतांची चोरी करू देणार नाही. निवडणूक आयोग चोरी कसा करतो हे पूर्वी माहित नव्हते. परंतु आता सर्वांना माहित आहे. आम्ही त्यांची चोरी पकडून जनतेला दाखविण्याचे काम करू. भाजप आणि रालोआ उद्योगपतींसोबत धंदे चालविण्याचे काम करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

एका विधानसभा मतदारसंघात 1 लाखाहून अधिक मतांची चोरी झाल्याचे चौकशीत आम्हाला दिसून आले. यामुळे लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील हा मतदारसंघ भाजपने जिंकला होता. निवडणूक आयोग माझ्याकडून प्रतिज्ञापत्र मागत आहे, आयोग व्हिडिओग्राफी पुरविण्यास नकार देत आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुकीची चोरी केली जात आहे, परंतु बिहार निवडणुकीची चोरी आम्ही भाजपला करू देणार नाही असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे.

ही राज्यघटना वाचविण्याची लढाई आहे. पूर्ण हिंदुस्थानात संघ आणि भाजप राज्यघटना नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत आमची आघाडी सरस ठरली, परंतु विधानसभेत आमची आघाडी पराभूत झाली. निवडणूक आयोगाने जादूद्वारे 1 कोटी मतदार तयार केले, जेथे हे मतदार तयार झाले, तेथेच भाजप विजयी झाला आहे. आमचा एकही मतदार कमी झाला नाही, परंतु भजपला या सर्व नव्या मतदारांची मते मिळाली आणि तो विजयी झाल्याचा आरोप काँग्रेस नेत्याने केला.

चोरांना हटवा, भाजपला पळवा : लालूप्रसाद

बिहारच्या जनतेने चोरांना हटवावे आणि भाजपला पळवून लावावे. आमच्या इंडी आघाडीला बिहारच्या जनतेने विजयी करावे. कुठल्याही किमतीत भाजपला राज्यात पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखायचे आहे. सर्व लोकांनी एक होऊन राहुल गांधी तसेच तेजस्वी यादव यांना साथ द्यावी. लोकशाहीला मजबूत करत भाजपला राज्यातून हद्दपार करावे असे उद्गार लालूप्रसाद यादव यांनी सभेला संबोधित करताना काढले आहेत.

मोदी, संघाला केले लक्ष्य

आमच्या देशाच्या स्वातंत्र्यढ्यात सामील सर्व लोकांनी आम्हाला मताधिकार दिला. परंतु आता पंतप्रधान मोदी हे याच अधिकाराला आव्हान देत आहेत. संघ देशाच्या स्वातंत्र्याच्या विरोधात होता, स्वातंत्र्यलढ्यात सामील होत संघाचे किती लोक तुरुंगात गेले हे कुणी सांगू शकते का असे प्रश्नार्थक विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे.

Comments are closed.