Asia Cup 2025 : आशिया कपसाठी 'हे' 11 भारतीय खेळाडू निश्चित; बाकी ठिकाणी तगडी टक्कर
क्रिकेट एशिया कप 2025 साठी भारतीय क्रिकेट टीमची घोषणा लवकरच होणार आहे. कॅप्टन सूर्यकुमार यादव यांनी फिटनेस टेस्ट पास केली आहे आणि तेच या स्पर्धेत टीमचे नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या बरोबर अनेक खेळाडूंची जागा पक्की मानली जात आहे, तर काही खेळाडूंना बाहेर बसावं लागू शकतं.
एशिया कप 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या दरम्यान UAE मध्ये खेळवला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असून 14 सप्टेंबर रोजी त्यांच्यात सामना होईल. पाकिस्तानने आपला स्क्वॉड आधीच जाहीर केला आहे, ज्यामध्ये बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान नाहीत. या दोघांचा T-20 करिअर जवळपास संपल्याचं मानलं जातं. दुसरीकडे भारतीय टीमचा स्क्वॉडही लवकर जाहीर होणार असून, 11 खेळाडूंची नावे जवळपास निश्चित झाली आहेत.
टीममध्ये पक्के मानले जाणारे खेळाडू – अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शुभमन गिल, रिंकू सिंह, जितेश शर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती.
गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने आपली उपलब्धता दाखवली आहे. तो फिट असेल तर त्याला टीममधून बाहेर ठेवणं शक्य नाही. त्याच्यासोबत अर्शदीप सिंह असणार आहे. तिसऱ्या पेसरच्या भूमिकेसाठी मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यात टक्कर आहे. बुमराह अनुपस्थित राहिला तर हे दोघेही टीममध्ये सामील होऊ शकतात. कृष्णाने IPL 2025 मध्ये पर्पल कॅप जिंकली होती.
ऑलराउंडरच्या भूमिकेत हार्दिक पांड्या ठरलेले आहेत. अतिरिक्त ऑलराउंडरसाठी शिवम दुबे आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यात स्पर्धा आहे. आकडेवारीनुसार शिवम पुढे असला तरी सिलेक्टर्स आणि कोच गौतम गंभीर नितीशवर विश्वास ठेवताना दिसले आहेत.
अतिरिक्त फलंदाजांच्या बाबतीत श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि यशस्वी जायसवाल यांच्यात कडवी स्पर्धा आहे. राहुल ओपनिंगसोबत विकेटकीपिंग करू शकतो. अय्यरचा मोठ्या स्पर्धांमधील रेकॉर्ड जबरदस्त आहे. जायसवाल आक्रमक फलंदाजी करतो, पण संजू आणि अभिषेकची जागा पक्की असल्यामुळे त्याला टीममध्ये संधी मिळणं कठीण दिसतं. आता निर्णय सिलेक्टर्स आणि सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील मॅनेजमेंटवर अवलंबून असेल.
Comments are closed.