सीपी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार आहेत.

रालोआकडून उमेदवारी : भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब : 21 ऑगस्टला अर्ज भरणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक रविवारी पार पडली असून यात उपराष्ट्रपतिपदासाठी सी.पी. राधाकृष्णन यांची उमेदवार म्हणून निवड झाली आहे. राधाकृष्णन हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तामिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेले राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पद भूषविण्याची संधी मिळणार आहे.

राधाकृष्णन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले भाजप नेते असून ते दोनवेळा कोइम्बतूरचे खासदारही म्हणूनही निवडून आले होते. तसेच त्यांनी यापूर्वी झारखंड आणि तेलंगणा या राज्यांचे राज्यपालपद भूषविले आहे. राधाकृष्णन यांच्या उमेदवारीला आता तामिळनाडूतील सत्तारुढ पक्ष असलेल्या द्रमुकचे समर्थन मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होणार आहे. राधाकृष्णन हे चार दशकांपेक्षा अधिक काळापासून राजकारण आणि सामाजिक जीवनात सक्रीय राहिले आहेत. तसेच त्यांना तामिळनाडूच्या राजकारणातील आदरणीय चेहरे मानले जाते.

राधाकृष्णन हे तामिळनाडूच्या तिरुप्पूरचे रहिवासी आहेत. तसेच राधाकृष्णन हे ओबीसी समुदायाशी संबंधित नेते असल्याने त्यांच्या निवडीतून भाजपला राजकीय समीकरणे साधणे शक्य होणार आहे. याचबरोबर तामिळनाडूतील नेत्याची निवड करत भाजपने या दक्षिणेच्या राज्यातील स्वत:चा प्रभाव वाढविण्याचे संकेत दिले आहेत. तसेच काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांकडून दाक्षिणात्य राज्यांवर केंद्राकडून अन्याय होत असल्याचा आरोप खोडून काढण्याची संधी यानिमित्ताने भाजपने साधली आहे.

राधाकृष्णन हे 21 ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यादरम्यान रालोआशासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याचदिवशी मतमोजणी होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 21 ऑगस्ट आहे. 25 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी रात्री अचानक उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे उपराष्ट्रपतिपदाची ही निवडणूक होणार आहे. 74 वर्षीय धनखड यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2027 पर्यंत होता. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे बराच काळ उलटसुलट चर्चाही सुरू होती.

संसदेत रालोआकडे बहुमत

लोकसभेत एकूण खासदारांची संख्या 542 आहे, तर एक जागा रिक्त आहे, रालोआचे 293 खासदार आहेत, तर राज्यसभेत एकूण 245 खासदार असून रालोआकडे 129 चे संख्याबळ आहे. तसेच उपराष्ट्रपतिपदासाठी नामनिर्देशित खासदारही रालोआ उमेदवाराला मतदान करतील, असे मानले जात आहे. यामुळे सत्तारुढ रालोआला एकूण 422 खासदारांचे समर्थन प्राप्त आहे. बहुमतासाठी 391 खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.

Comments are closed.